अकोला

सावरगाव येथील प्रकार: लाखोंचा अपहार केल्याचा आरोप!चौकशी साठी पालकमंत्र्यांना साकडे!

प्रमोद कढोने

पातूर१७ऑक्टोबर : तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतला मिळालेल्या लाखो रुपये निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे , तसेच ग्रामस्थ मंगेश राठोड, धीरज राठोड, यांनी थेट अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे शनिवार रोजी धाव घेऊन तक्रार केली आहे. सावरगाव ग्रामपंचायतला मिळालेल्या लाखो रुपये निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.गावाच्या विविध विकास कामासाठी मिळालेल्या निधीतून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप धीरज राठोड, व मंगेश राठोड, यांनी ११ ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. आता ग्राम पंचायत सदस्य विजय कांबळे यांनी सुद्धा उडी घेऊन खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे.सावरगाव येथे विकास कामांवर गेल्या तीन वर्षांत जवळपास ३५ लाख रुपये निधी खर्च करून ही गावातील काही कामे अर्धवट, काही कामे निकृष्ट दर्जाचे, तसेच काही कामे कागदोपत्री दाखवून सरपंच, सचिव, रोजगार सेवक, व संगणक ऑपरेटर, या चौघांनी संगनमताने लाखो रुपये निधीचा अपहार केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी जवळपास वीस लाख रुपये खर्च करण्यात आले, मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. नाली बांधकाम न करता कागदोपत्री दाखवून ८० हजाराचे देयक काढले आहे. एलईडी लाईट खरेदी व दुरुस्ती कागदोपत्री, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती व पाणीपुरवठा कागदोपत्री दाखवून निधी लाटल्याचा आरोप केला आहे. शालेय साहित्य खरेदी कागदोपत्री आणि सॅनिटायझर खरेदी,अपंग निधी, स्वच्छता अभियान, तसेच पाणी फाउंडेशन साठी डिझेल साठी रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात आली, परंतु देयक ग्राम पंचायतने काढले, दर महिन्याला मजुरीवर पंधरा ते वीस हजार रुपये कागदोपत्री दाखवून लाखो रुपये निधीचा अपहार केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे खर्च करण्यात आलेला निधी व तीन वर्षात केलेल्या कामाची मोका पहाणी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर तक्रारीवर पालकमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये सावरगाव ग्रामपंचायतला लाखो रुपयांचा निधी मिळाला, मात्र सरपंच सचिव यांनी संगनमताने त्या निधीतून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संपुर्ण ग्रामपंचायतची खातेनिहाय चौकशी करण्याबाबतची तक्रार पालक मंत्री यांच्याकडे केली आहे.
विजय कांबळे ग्रामपंचायत सदस्य सावरगाव

सावरगाव ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्या बाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी व पातुरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. मोका पाहणी करून चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल
मंगेश राठोड ग्रामस्थ सावरगाव