अकोला: बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या उद्भवत आहे. लहान मुलांसह मोठ्यांमध्ये आढळणारा हा लठ्ठपणा घालवण्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आला. जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत रविवारी शहरातून सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
अतिपोषण अर्थात लठ्ठपणाच्या समस्येवर नियंत्रणासाठी जनजागृती व्हावी यासाठी ५ मार्चला जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे रविवारी जनजागृती सायकल रॅलीकाढण्यात आली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सकाळी या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय चौक मार्गे गांधी चौक, मध्यवर्ती बसस्थानक येथे फेरी पोहोचली.
टॉवर चौकात समारोप झाला. रॅलीमध्ये आरोग्य उपसंचालक तथा जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, आरएमओ डॉ. भावना हाडोळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.