अकोला : पुणे येथे क्रिएटिव्ह ग्रुप, औरंगाबादच्या वतीने आयोजित ज्युनियर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा सीजन ३ ग्रुप ‘सी’ मध्ये प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी साना संजय खडसे हिने प्रथम क्रमांकासह विजेता होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. गत जानेवारी महिन्यात क्रिएटिव्ह ग्रुप औरंगाबाद द्वारे जिल्हास्तरावर ऑडिशन घेण्यात आल्या.
अकोला येथे झालेल्या ऑडिशनमध्ये सानाची १० ते १४ वर्ष वयोगटात महाराष्ट्र स्तरावर निवड झाली. ज्युनियर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांमध्ये साना अव्वल ठरली असून तिने सादरीकरण कौशल्य व जनरल नॉलेजच्या जोरावर स्पर्धेत विजय संपादन केला आहे.
या स्पर्धेत घेण्यात आलेल्या पारंपरिक ड्रेस मध्ये परिचय, कौशल्य सादरीकरण, रॅम्प वॉक, जनरल नॉलेज, एक्सटेम्पोर आणि ज्युरी राऊंडमध्ये साना खडसे हिने उत्कृष्ट सादरीकरण केले आणि सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या २०१७ च्या मिसेस युनिव्हर्सल पल्लवी कौशिक व क्रिएटिव्ह ग्रुप, औरंगाबाद चे संचालक रवी जयस्वाल यांच्या हस्ते सानाला जूनियर महाराष्ट्र सौंदर्यवती विजेता मुकुट तथा सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले प्रशासकीय सेवेसोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे माझे वडील यांच्यामुळे आम्हालादेखील सामाजिक दृष्टी मिळाली असून माझे वडील माझे आदर्श असल्याचे साना म्हणाली.
प्रशासकीय अधिकारी बनून समाज सेवा करण्याचे ध्येय असल्याचे सानाने स्पर्धेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या स्पर्धेला ज्युरी म्हणून पल्लवी कौशिक मिसेस युनिव्हर्सल २०१७, जस्मिन मिसेस क्वीन वर्ल्ड मंजुषा मुळीक, इंडियन क्वीन ऑफ क्वीन २०१९ मिस रुपाली, राजेश चंचलांनी, गौरव सिपाणी यांनी काम पाहिले. लहानपणापासून घेतलेले शिक्षण, ज्ञान, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर, प्रश्नांची उत्तरे दिली आणि मराठमोळे ड्रेस परिधान करून उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे सानाने सांगितले.
साना हिला तिचे वडील निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, आई नीता खडसे,भाऊ संनीत खडसे, अमोल बेलखेडे, मनीषा बेलखेडे तसेच प्रभातचे संचालक गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, अस्पायर इन्स्टिट्यूटचे संचालक सचिन बुरघाटे, प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सानाचे सर्वत्र कौतुक होत आहे,