water-reading-of-dam
अकोला

संपामुळे अकोला जिल्ह्यातील जलसाठ्याच्या नोंदी नाही; तुर्तास मुबलक जलसाठा

अकोला : उन्हाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पातील जलसाठी नियमित घेतली जाणारी नोंद आणि लघु प्रकल्पातील आठवड्यातून एकदा घेतली जाणारी नोंद, जलसंपदा विभागातील कर्मचारी संपावर गेल्याने उपलब्ध जलसाठ्याच्या नोंदी घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पात किती जलसाठा उपलब्ध आहे, याची माहिती पाणी पुरवठा योजनांनाही मिळालेली नाही.

जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे प्रकल्प तर मोर्णा, निर्गुणा, उमा हे तीन मध्यम आणि २४ लघु प्रकल्प अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात. उन्हाळा सुरु झाला की पाण्याची मागणी वाढते तसेच बाष्पीभवनातही वाढ होते. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची दररोज नोंद घेतली जाते.

ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील निर्गमित केली जाते. तर लघु प्रकल्पातील जलसाठ्याची माहिती दर गुरुवारी घेतली जाते. मात्र जलसंपदा विभागात २००५ नंतर नियुक्त झालेले कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीसाठी संपात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात सद्यस्थितीत किती जलसाठा उपलब्ध आहे? याची नोेंद घेतल्या गेलेली नाही.

यावर्षी नोव्हेंबर अखेर पर्यंत पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे तुर्तास मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात ३५ ते ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मात्र पावसाने दडी मारली असती आणि प्रकल्पात जलसाठा अत्यल्प असता तर उन्हाळ्याच्या प्रारंभापासून प्रकल्पातील जलसाठ्यावर दररोज लक्ष ठेवावे लागते. ते ठेवता आले नसते.