मुंबई

संजय राऊतांकडून सात दिवसात लेखी खुलासा मागविणार : सभापतीचे स्पष्टीकरण

विधानपरिषद / संतोष गायकवाड

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंग संदर्भात नैसर्गिक न्यायतत्वानुसार राऊतांकडून सात दिवसांत लिखित स्वरूपात खुलासा मागवून, पुढील निर्णय घेण्यात येईल असे स्पष्टीकरण सभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत दिले.

महाराष्ट्र विधिमंडळ हे तर चोर मंडळ असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. बुधवारी राऊतांच्या या विधानावरून विधानपरिषदेत तीव्र पडसाद उमटले होते. सभागृहात गदारोळ झाला होता. विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे यांनी संजय राऊत यांचे विधान अवमानकारक आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक अशी जोरदार खडाजंगी झाली होती. त्यावेळी सभापती नीलम गोऱ्हे यांनी अभ्यास करून उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज विधानपरिषदेत सभापतींनी स्पष्टीकरण दिले.

संजय राऊत यांचे वक्तव्यामुळे लोकप्रतिनिधींचा अवमान झाला आहे. हे प्रकरण गंभीर असून त्यांच्या विरोधात राम शिंदे यांनी मांडलेला प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवून देणार आहे. हक्कभंग समिती अजून स्थापन झाली नसली तरी येत्या सात दिवसात नैसर्गिक न्याय तत्वावर संजय राऊत यांच्याकडून लिखित स्वरूपात माहिती मागून घेतली जाईल. त्यानंतर कारवाईसाठी समितीकडे पाठवायचे की नाही हे ठरवले जाईल. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. एखाद्या खासदाराविषयी हक्कभंग प्रस्ताव आल्यास माहितीसाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्यांचा खुलासा आल्यानंतर सात दिवसात त्याबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.