Maharashtra-Farmers
राजकीय

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला अधिवेशनात जाब विचारू : नाना पटोले

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी : राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्दवस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला सभागृहात जाब विचारू व शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्याची स्थिती भयावह असताना शिंदे-फडणवीस सरकार मात्र राज्यपालांच्या भाषणातून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. सरकारने हमी भावाप्रमाणे खांद्याची खरेदी केली पाहिजे. मका, हरभरा, कापूस, सोयाबीन, धान सुद्धा कमी दराने खरेदी केला गेला. आता शेतकऱ्यांकडचे धान संपल्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांनी धानाची किंमत दुप्पट केली. अशीच परिस्थिती इतर शेतमालाचीही आहे. शेतमालाला भाव नाही व शेतीला लागणारे साहित्य व वीज महाग झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत पण शिंदे फडणवीस सरकार मात्र झोपलेले आहे. राज्यातील ईडी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे.

देशात हुकूमशाही कारभार ..

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, २०१४ साली केंद्रात भाजपाची सरकार आल्यापासूनच देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु असून भाजपा सत्तेचा दुरुपयोग करत आहे. देशात सध्या अघोषीत आणीबाणी असून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात आहे. लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाविरोधात तीव्र संताप आहे, या संतापाचा लवकरच उद्रेक झाल्याचे दिसून येईल, असेही पटोले म्हणाले.