अकोला

शरीर हे परमार्थाचे माध्यम- हभप सोपान महाराज काळपांडे

अकोला: या भोगादी परिचक्राच्या विश्वात शरीर हे केवळ भोगाचे साधन नसून ते प्रभुप्राप्तीचे साधन ही आहे. हे साधन साध्य करताना परमार्थ करावा लागतो. आणि शरीर हे परमार्थ प्राप्तीचे मोठे माध्यम असून या माध्यमातून जाण्यानेच भगवंताची प्राप्ती होत असल्याचा हितोपदेश मूर्तिजापूर येथील कीर्तनकार हभप सोपान महाराज काळपांडे यांनी केला.

संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती च्या वतीने स्थानीय कौलखेड मार्गावरील गायत्री नगर येथील मैदानात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात हभप सोपान महाराज काळपांडे यांनी कीर्तनाचे सहावे पुष्प सादर करीत तुकारामांच्या ‘आम्ही बलवान झालो’ या सूत्रांची व्याख्या विशद केली. ते म्हणाले, परमार्थ करीत असणाऱ्या व्यक्तींना समाज दुबळा समजतो.

हे अनादी काळापासूनचे सूत्र आहे. परमार्थ प्राप्तीच्या मार्गातील ज्ञानोबा, एकनाथ पासून तर तुकोबारायापर्यंत सर्व संतांना समाजाने सदा दुबळे समजले. मात्र या दुबळेपणाचा अशा संतावर कोणताही परिणाम झाला नाही, किंबहुना त्यांनी हे दुबळेपण स्वीकारलेच नाही. म्हणूनच ते लौकिक व पारलौकिक

विश्वाचे ठरले असल्याचे हभप काळपांडे महाराज यांनी सांगितले. परमार्थातूनच परमात्म्याची प्राप्ती होते. मात्र परमात्याचा आश्रित होण्यासाठी काय करावे. याचे सुंदर विवेचन आपल्या कीर्तनात हभप काळपांडे महाराजांनी या कीर्तनात करीत तुकोबारायांना अभिप्रेत असणाऱ्या बलवान या सूत्राची मीमांसा केली. ते म्हणाले, बल हा काळ सापेक्ष शब्द आहे. ज्याप्रमाणे माशाचे बळ पाण्यात, पक्षाचे बळ आकाशात, बाळाचे बळरडण्यात तथा दुबळ्यांचे बळ हे राजात अथवा शासनात असते. त्याचप्रमाणे शरीर, मन, धर्म, तप, ज्ञान, धन हे बळाचे प्रकार आहेत. मग कोणते वळ तुकोबारायांना प्राप्त झाले असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, संतांचे बल हे परमार्थात असते. भगवंताच्या ध्यानात असते. निरपेक्ष भावनेने प्रभू प्राप्ती व सकल जगताचे कल्याण ही मनीषा अंगी बाळगून संत परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करीत असतात. हेच बल संतांचे असल्याचा हितोपदेश हभप काळपांडे महाराज यांनी यावेळी केला. सत्र प्रारंभी रुहाटीया परिवाराच्या वतीने हभप काळपांडे महाराज यांचे स्वागत करण्यात आले.

कीर्तन महोत्सवात दि १६ मार्च रोजी हभप उमेश महाराज दशरथे परभणी यांचे कीर्तन होणार आहे. दि १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गुरुवर्य हभप स्वामी महाराज बीड यांच्या काल्याच्या किर्तनाने या किर्तन महोत्सवाची पूर्णाहुती होणार आहे. या दिनी साय ५ वाजता समितीच्या वतीने परिसरातून गाथादिंडी आयोजित करण्यात आली आहे.

या गाथा दिंडीत महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीज सेवा समिती, गायत्री नगरच्या समस्त पदाधिकारी व सेवाधाऱ्यांनी केले.