अकोला : महापालिकेने वाढवलेला अवाजवी मालमत्ता कर रद्द करण्यासह विविध मागण्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दि.२० रोजी वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरच्या वतीने महापालिकेला धडक महामोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानी शनिवार दि.१८ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शंकरराव इंगळे म्हणाले, वाढवलेल्या मालमत्ता कराला आम्ही सर्व प्रथम विरोध केला होता, आत्ताही आमचा विरोधच आहे.याच सोबत चुकीच्या पद्धतीने अवाजवी पाणीपट्टी वसुल केली जात आहे. ती थांबवावी तसेच पिंप्री चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृहाचे सौदर्यीकरण करुन परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, कलावंतासाठी सांस्कृतिक भवन सुरु करण्यात यावे, महापालिकेच्या भरतीया, कस्तुरबा गांधी आदी पाच रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, अतिक्रमीत जागा नियमानुकुल करुन घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याकरीता कायमस्वरुपी झोननिहाय डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करावी, न्यु तापडीया नगर रेल्वे गेट उड्डाणपूलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, हद्दवाढ भागात मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या नंतरच या भागातुन मालमत्ता कर वसुल करण्यात यावा, आदी विविध मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे. वंचित बहुजन महासंघाच्या कार्यालयापासून हा मोर्चा निघणार असून विविध मार्गाने हा मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे.
या मोर्चा नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शंकरराव इंगळे यांनी केले. पत्रकार परिषदेला निलेश देव, अरुंधती शिरसाट, संतोष हुशे, वंदना वासनिक, मनोहर पंजवानी, सुशिला जाधव, सरला मेश्राम, आशिष मांगुळकर, जय तायडे, कुणाल राऊत, पराग गवई आदी उपस्थित होते.