Fraud
क्राईम

विवाहाची खोटी नोंद करणारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा !

बीएसएफ जवानाची पोलीसांत तक्रार

माझोड : विवाहाची खोटी नोंद करणारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा अशा आशयाची तक्रार बीएसएफ जवान पंचशील तायडे यांनी पातूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधीत ग्रामसेवकासंमवेत इतरांवर काय कारवाई होते या कडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

पंचशील तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी चिखलगाव येथील रहिवासी असून बीएसएफ मध्ये नोकरीला होतो.तेव्हा कर्तव्यावर रुजू असतांना विवाह निबंधक तथा सचिव भडारज खुर्द,किसन इंगळे,महादेव इंगळे,ललिता इंगळे,शिवरुद्र गायकवाड, सुषमा इंगळे व डॉ. एच.एन.सिन्हा महाविद्यालय पातूर आदी गैरअर्जदारांनी संगनमत करून विवाह नोंदणीचे खोटे दस्तऐवज तयार केले आणि खोट्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लावून तक्रार केली.

त्या तक्रारीच्या आधारांवर मला नोकरीतून कमी करण्यात आले.तेव्हा आपण चौकशी केली असता सर्व गैरअर्जदारांनी विवाह नोंदणीचे खोटे दस्तऐवज तयार केले. माझा भडारज खुर्द येथील सुषमा इंगळे हिच्याशी विवाह झालेलाच नाही, त्यामुळे माझी व शासनाची फसवणूक केली आहे असे तायडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढे तक्रारीत म्हटले की, २६ ऑक्टोबर २०१६ रोजी किसन इंगळे, ज्योतिराम इंगळे, शिवरुद्र गायकवाड लाईनमन महान,सचिव आर.डी. अरखराव व सुषमा इंगळे यांनी संगनमत करून १२ डिसेंबर २०१५ रोजी विवाह झाल्याचे खोटे प्रमाणपत्र बनविले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विवाह नोंदणी अधिनियमानुसार पती पत्नी व तीन साक्षीदार हजर असणे जरुरीचे आहे, परंतु २६ ऑक्टोबर २०१६ रोजी आपण बीएसएफ जम्मू येथे कर्तव्यावर हजर होतो,त्यामुळे सर्व गैरअर्जदार यांनी खोटा व्यक्ती उभा करून विवाह नोंदणी केली. तसेच माझी स्वाक्षरी सुध्दा खोटी केली आहे. त्यामुळे सर्व संबंधीतांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पंचशील तायडे यांनी तक्रारीतून केली आहे.

पंचशील तायडे यांची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यांच्या तक्रारीची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – हरिष गवळी ठाणेदार पोलीस स्टेशन पातूर