eknath-shinde-vidhimandal
राजकीय

विरोधक नव्हे नवाब मलिक देशद्रोही !

“त्या” वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा विधानपरिषदेत खुलासा

मुंबई : देशद्रोहीविषयीच वक्तव्य हे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्याविषयी नव्हतं. तर माझं वक्तव्य हे नवाब मलिक यांच्याविषयी होतं असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्कभंग दाखल झाल्यानंतर विधानपरिषदेत केला.

देशद्रोह्यांना तुम्ही पाठीशी घालणार असाल तर मी एकदा नव्हे ५० वेळा, देशद्रोही म्हणण्याचा गुन्हा करेन, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्यांसोबत चहापान टळले ते बरं झालं अशी प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले.

विधानपरिषदेमध्ये त्याचे पडसाद उमटले. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला. नैसर्गिक न्याय तत्वानुसार मुख्यमंत्र्यांना खुलासा करण्याची परवानगी सभापतींनी दिली. मात्र ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे खुलासा करण्यापेक्षा हक्कभंग समितीसमोर खुलासा करावा, अशी मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप करत मुख्यमंत्र्यांचा शब्द प्रमाण मानावा, अशी भूमिका मांडली. तसेच अजित पवारांनी महाराष्ट्रद्रोही म्हटलेल्या शब्दाची आठवण करुन दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण आपल्या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले.

मलिक यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिम, इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन, इकबाल मिरची, हसीना पारकर यांच्याशी व्यावहारिक संबंध आहेत. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्याशी मलिक यांनी जमिनीचे आर्थिक व्यवहार केले आहेत.

मुंबईतील बॉम्बस्फोटात ज्यांना शिक्षा झाली, त्या देशद्रोह्यांशी आर्थिक संबंध ठेवल्याप्रकरणी मलिक कोठडीत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीआमची तुलना महाराष्ट्र द्रोह्यांशी केली. आम्ही महाराष्ट्र द्रोही कसे.? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

…. तेव्हा नवाब मलिक देशद्रोही आठवले नाही का ?

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. आम्ही देशद्रोह्यांचे समर्थन करत नाही. मात्र नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. ज्यावेळी महाविकास आघाडीच्या सत्तेत आपण मंत्रिमंडळात मालिकांच्या मांडीला मांडी लावून बसलात तेव्हा मलिक देशद्रोही आहेत हे आठवले नाही का ? अश्या शब्दात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना खुलाश्यानंतर कोंडीत पकडले.