ताज्या बातम्या नागपूर

वामन मेश्राम यांच्या सभेला परवानगी नाकारली! नागपूर पोलीस आयुक्तांचा निर्णय उच्च न्यायालयात कायम!

नागपूर 6 ऑक्टोबर : नागपूर येथे होत असलेल्या भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कडबी चौकातील बेझनबाग मैदान येथे आयोजित सभेला परवानगी नाकारण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी कायम ठेवला. तसेच आयोजकांना ही सभा ६ व ९ ऑक्टोबर हे दोन दिवस सोडून इतर कोणत्याही तारखेला घेण्याची परवानगी मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे नवीन अर्ज सादर करता येईल, असे देखीलउच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्या. गोविंद सानप यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.नागपुरात धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने  लाखो अनुयायी दीक्षाभूमी येथे येण्याचा अंदाज असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत बंदोबस्तामध्ये व्यस्त राहणार आहेत. दीक्षाभूमीदर्शनानंतर बहुसंख्य अनुयायी ६ ऑक्टोबरला कामठीतील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी जातील.बेझनबाग मैदान कामठी रोडवर आहे.दरम्यान, या अनुयायांना सभेत सहभागी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयालयावर हल्लाबोल करण्याचा आयोजकांचा कट आहे. आयोजकांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. परिणामी, ६ ऑक्टोबरच्या सभेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. पुढे ९ तारखेला ईद आहे. त्यामुळे ही सभा इतर कोणत्याही तारखेला आयोजित करता येईल, असे वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर यांनी पोलिसांची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले. याशिवाय राज्य गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवालही न्यायालयात सादर केला. न्यायालयाने हे मुद्दे विचारात घेता हा निर्णय दिला.पोलिसांच्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध आयोजक भारत मुक्ती मोर्चाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होतीआयोजकांच्या वतीने ॲड. फिरदौस मिर्झा यांनी न्यायालयात बाजू मांडली. ही सभा शांततापूर्ण वातावरणात घेतली जाणार आहे. सभेत कोणत्याही प्रकारच्या शस्त्राचा वापर करण्यात येणार नाही.त्यामुळे मूळात या सभेसाठी परवानगी मागण्याची गरज नाही. परंतु, कायद्याचा सन्मान करणारे नागरिक असल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी त्यांचा परवानगीचा अर्ज नाकारून आयोजकांच्या मूलभूत अधिकाराचे हनन केले आहे, असे ॲड. फिरदौस मिर्झा यांनी युक्तिवाद केेला.