अकोला

वाघ महाराजांनी केले तुळशीच्या माळीचे वाटप

अकोला: गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रदीप मिश्रा यांच्या म्हणण्यावरुन गावागावात शिव मंदिरात भगवान शिवाची पूजा करणार्‍या भक्तांची संख्या वाढली आहे. शिवाची पूजा करायला वारकरी सांप्रदायिक मंडळीचा कधीच विरोध नाही. परंतु ज्याप्रकारे आणि ज्या पद्धतीने पूजा अर्चना सुरू आहे ती चुकीची असून, याला कुठल्याही प्रकारे शास्त्राचा आधार नाही आणि मागील आठवड्यात मध्य प्रदेशात या महाराजांनी रुद्राक्षाचे वाटप ठेवले होते.

यात चेंगराचेंगरी होऊन बरेच भाविक जखमी झाले तर काही भाविकांचे प्राण गेले. याला जबाबदार संबंधित महाराज असून, भाविक सुख, समाधान, आरोग्य मिळाले पाहिजे म्हणून रुद्राक्ष मिळविण्यासाठी तेथे गेले होते. सुख, समाधान, आरोग्य तर सोडाच, पण प्रचंड त्रास जाणार्‍या लोकांना सहन करावा लागला. पंढरपूरला लाखाने गळयात तुळशीची माळ घालणारे भाविक येतात सर्वाची सोय कंबरेवर कर असणारा दिनाचा सोयरा करतो तिथं येणार्‍या प्रत्येक भाविकाला सुख,शांती आणि समाधान मिळते ही शेकडो वर्षाची परंपरा आहे म्हणून खर्‍या सुखासाठी गळयात तुळशीची माळ घाला असं आवाहन करून हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी वारी भैरवगड येथे आलेल्या शेकडो भाविकांना मोफत तुळशीच्या माळीचे वाटप केले.

ते श्री संत वासुदेव महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताह मध्ये कथेतून बोलत होते ते पुढे म्हणाले की पंढरपूर येथे आषाढी, कार्तिक,माघ आणि चैत्राच्या वारीत लाखो भाविक हजारोच्या संख्येने दिंडयांपताका घेऊन येतात.

येथे येणार्‍याच्या प्रत्येकाच्या गळयात तुळशीची माळ असते, कुणाला येथे येण्यासाठी कुणीही आवाहन करत नाही, कुठलेही प्रलोभन दिल्या जात नाही तरीही भाविक येतात आणि विटेवर उभ्या असलेल्या सावळया प्रब्रम्हाचे दर्शन घेतात आपल्या वेदना त्या देवाकडे मांडतात आणि त्यातून तो देव भक्तांची सुटका करतो. परत जाणार्‍या भाविकाच्या चेहर्‍यावर एक वेगळे समाधान आणि शब्दांत व्यक्त करता येत नाही असा परमोच्च आनंद असतो म्हणून खरे सुख समाधान आणि आनंद मिळवायचा असेल तर गळ्यात तुळशीची माळ घाला एकादशीचे व्रत करा शिव म्हणजे भगवान शंकर देखील पंढरीचे वारकरी होते हे लक्षात घ्या, असे प्रतिपादन वाघ महाराज यांनी केले व याच वेळी वारी भैरवगडला आलेल्या भाविक भक्तांना मोफत तुळशीच्या माळाचे वाटप करून रूद्राक्षांच्या वाटपाला वेगळा पर्याय देऊन कार्यक्रमाची सांगता केली.