Prakash Ambedkar
अकोला राजकीय

‘वंचित’मुळे ‘मविआ’चा उमेदवार पडल्याचा आरोप चुकीचा -प्रकाश आंबेडकर

अकोला: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. पण, वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केला.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवर भाष्य केले.कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजय हा रवींद्र धंगेकर यांचा आहे. तो विजय पक्षाचा आहे असे मी मानत नाही.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे जर उभे राहिले नसते तर राहुल कलाटे निवडून आला असता अस का म्हणत नाही? त्यामुळे वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.औरंगजेब हे या मातीतले आहेत की नाहीत? तुम्हीच सांगा. ज्याला जाती धर्माचे राजकारण करायचे त्याला करू द्या. लोकच काय ते ठरवतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘प्रॉब्लम ऑफ रूपी’ या ग्रंथाला ११ मार्च रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित ‘वाढती महागाई आणि रुपयाचं अवमूल्यन’ या विषयावर परिसंवाद घेण्यात येणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वीच हा प्रश्न या ग्रंथातून मांडला होता. आजही तोच प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आजही त्यावर ठोस उपाययोजना शोधू शकलेली नाही, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.