अकोला : येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणअंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत गरजू व्यक्तिंसाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार लोक अभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. केवले यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यात आले.
या कार्यालयात मुख्य अभरिक्षक एन.एन. उंबरकर, उपमुख्य लोक अभिरक्षक डी.डी. गवई, सहायक लोक अभिरक्षक व्ही.एम. किर्तक, श्रीमती बी.डी. राऊत, एम.पी.सदार, ए.ए.हेडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यालयात अकोला जिल्हा न्यायालयात सरकार तर्फे दाखल सर्व प्रकरणांमध्ये गरजू व्यक्ती , आरोपींसाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. या सेवेचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.