राजकीय

लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा – आमदार विनोद निकोले

फलक झळकवून विधानभवन मध्ये जोरदार आंदोलन

मुंबई : लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी जोरदार घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी फलक झळकवून मागणी केली आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, 20 ते 25 हजार शेतकऱ्यांच्या लाँगमार्च नाशिक हून मुंबई च्या दिशेने निघाला आहे. दि. 20 मार्च 2023 रोजी ते मुंबईत धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यात शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला कांदा आहे कांद्याला 600/- रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, तसेच 2000 रुपये दराने कांद्याला नाफेड मार्फत खरेदी करा. त्याचप्रमाणे शेतीसाठी 12 तास वीज उपलब्ध करून शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ केली गेली पाहिजे. अंगणवाडी सेविका, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार कामगार, ग्रामसेवक, पोलीस पाटील या जनतेशी निघडीत असलेले कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेऊन वेतन श्रेणी लागू केली गेली पाहिजे. तसेच, घरकुल मध्ये जे गरीब कुटुंब राहतात, शेतकरी, कामगार, झोपडपट्टी राहणारा गरीब कुटुंब आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत त्यांना 1.40 लाख रुपये देण्यात येतात पण, वाढत्या महागाई मध्ये ही रक्कम अपुरी पडते म्हणून लाँगमार्च च्या माध्यमातून ही रक्कम 05 लाख रुपये पर्यंत वाढविण्यात यावी अश्या आमच्या मागण्या आहेत.

या रास्त मागण्या घेऊन शेतकरी नाशिक हून निघालेला आहे.आपल्याला माहितच आहे सन 2016 – 17 मध्ये सुद्धा नाशिक वरून असाच 200 किलोमीटर पायपीठ करून हा शेतकरी मुबई मध्ये धडकला होता. अक्षरशः महिलांचे, शेतकऱ्यांचे पाय रक्तबंबाळ झाले होते.

त्यावेळेस देखील महाराष्ट्रात राज्य सरकार हे भाजपा चे होते. त्यावेळेस त्यांनी लिखित स्वरूपात दिले होते की, तुमचे वन पट्टे तुमच्या नावावर करण्यात येईल, जी तुमच्या कब्जा मध्ये जमीन आहे ते क्षेत्र जीपीएस द्वारे मोजणी करून तुमच्या नावे करू अश्या अनेक ज्या मागण्या होत्या त्या लेखी स्वरूपात दिल्या होत्या परंतु, आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व बाबींचा विचार करून हा लाँगमार्च निघाला आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले.

त्यानंतर विधानसभेत दुपारी 12.00 वा. सुमारास विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शून्य प्रहर अन्वये लाँगमार्च संदर्भात मुद्दा उपस्थित केला असता त्यावर माकप आमदार विनोद निकोले यांनी देखील आपली बाजू मांडली असता मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, जेवढ्या सकारात्मक मागण्या आहेत त्यावर सकारात्मक विचार करून निणर्य घेण्यात येईल.