विदर्भ

राहेर ते पिंपळखुटा रस्त्याचे तीन तेरा!  रस्त्याच्या बिकट परिस्थितीमुळे ग्रामस्थ हैराण! अकरा वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत खडीकरणही उखडले

रामेश्वर वाढी
पातूर प्रतिनिधी७सप्टेंबर:-अकोला  जिल्ह्यातील ,पातुर तालुक्यात  असलेल्या मौजे राहेर ते पिंपळखुटा या तीन किलोमीटर रस्त्याचे तीन तेरा वाजल्याने,या रस्त्याच्या बिकट परिस्थिती मुळे नमूद गावातील ग्रामस्थ हैराण झाल्याची वस्तुस्थिती आहे.३किलोमीटर रस्त्याच्या कामाचे खडीकरण गेल्या अकरा ते बारा वर्षांपूर्वी करण्यात आले होते.तेव्हा पासून या रस्त्याचे डांबरीकरण  झाले नाही, असे असूनही या मतदारसंघातील आमदार महोदयांनी किंवा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी, रस्त्याच्या डांबरीकरण बाबतीत कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेऊन,नमूद रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ठोस उपाययोजना केली नसल्याने,  रस्त्याचे पुर्ण खडीकरण उखडून या रस्त्याला नाल्याचे रूप आले आहे .परिणामी राहेर येथील  ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.पाच ते सहा वर्षांपूर्वी पिंपळखुटा राहेर रस्त्याचे एक किलोमीटर मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते.डांबरीकरण झालेल्या एक किलोमीटर रस्त्याची सुद्धा दुर्दशा झालेली आहे.
तर उर्वरित दोन की.मी.रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत खडीकरणही उखडून गेले.यामुळे या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत.
या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत,पावसाळ्यात रस्त्याला तर चक्क नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे,रस्त्यावर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले असून,
रस्त्याच्या दोन्ही कडेला काटेरी झुडपे वाढलेली आहेत,यामुळे रस्त्यावरून पायी चालत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना पायी चालत जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. राहेर हे गाव जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर असल्याने, विकासापासून सुद्धा दूरच असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दैनिक राज्योन्नतीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
राहेर ते पिंपळखुटा रस्त्याचे खडीकरण गेल्या अकरा ते बारा वर्षांपूर्वी करण्यात आले होते.या मार्गाची एवढी दुरावस्था झालेली आहे,रस्ता आहे की पांदन आहे हे सुद्धा कळत नाही.तरी हा रस्ता लवकर दुरुस्त करण्यात यावा.
सौ.राजश्री अशोक बोराडे,सरपंच गट ग्रा.पं.राहेर(अडगांव )