देश

राहुल गांधींनी मागितला खुलाशासाठी वेळ

दिल्ली पोलिसांनी घेतली घरी जाऊन भेट

नवी दिल्ली  : ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान जम्मू-काश्मिरात बलात्कार पिडीतांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी राहुल गांधी यांच्यातर्फे करण्यात आलीय. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

भारत जोडो यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये पोहचली होती. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, अनेक महिलांनी माझी भेट घेतली आहे. त्यातील काही महिलांवर बलात्कार करण्यात आल्याचे त्यांनी मला सांगितले. त्या खूप दुखी असल्याने मी त्यांना या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊ का..?, असे विचारले होते. परंतु त्यांना ही बाब केवळ मलाच सांगायची होती. कारण याबाबतची माहिती पोलिसांना कळाली तर त्यांना अधिक नुकसान सहन करावे लागले असते असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

या वक्तव्यासंदर्भात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष आयुक्तांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पोलिसांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधी यांना बलात्कार पीडितांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माहिती मागितली असून त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक लोकांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना देशातील बलात्कार पीडितांबाबत एक वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत असून आवश्यकता भासल्यास राहुल गांधींची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले.