NIA Raid on PFI Office
देश

राजस्थान : पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएची छापेमारी

एनआयएच्या पथकाने जयपूर, बुंदी, भिलवाडा, सवाई माधोपूर आणि कोटा येथे एकाच वेळी कारवाई सुरू केली. मात्र, एनआयएने अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

जयपूर, 18 फेब्रुवारी : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी टेरर फंडिंग प्रकरणी राजस्थानमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक सदस्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान पीएफआयच्या अनेक सदस्यांना एनआयएने अटक केली आहे.

एनआयएच्या पथकाने जयपूर, बुंदी, भिलवाडा, सवाई माधोपूर आणि कोटा येथे एकाच वेळी कारवाई सुरू केली. मात्र, एनआयएने अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कोटा येथे 3 आणि जयपूर, सवाईमाधोपूर, बुंदी आणि भिलवाडा येथे प्रत्येकी एका ठिकाणी कारवाई करण्यात आली.

राजस्थानमध्ये यापूर्वी टाकलेल्या छाप्यात आरोपी सादिक सराफ आणि मोहम्मद आसिफ, अशफाक मिर्झा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चौकशीदरम्यान हे उघड झाले की पीएफआयचे कोटा जिल्ह्यात दोन्ही पीएफआय पदाधिकारी, सदस्य आणि कॅडर बेकायदेशीर कृत्यात सहभागी होते.

याप्रकरणी एनआयएने 19 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएने पीएफआय अधिकाऱ्यांच्या संशयित निवासी आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकले. त्यावेळी झडतीमध्ये डिजिटल उपकरणे, एअर गन, धारदार शस्त्रे आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. एनआयएकडून त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.