अकोला

रविकुमार राठी यांची शिष्टाई ठरेल सफल ; उपोषणकर्त्यांना मिळेल न्याय ?

मूर्तिजापूर : या तालुक्यातील कार्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या नविन विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी उपसरपंच व दोन ग्राम पंचायत सदस्यांनी येथील पंचायत समितीसमोर काल पासून उपोषण सुरू केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी यांनी समस्येवर तोडगा काढण्यसाठी उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून घेऊन बीडीओंशी चर्चा केली व  सकारात्मक भूमीका स्विकारण्याची त्यांना विनंती केली आहे.

त्यामुळे रविकुमार राठी यांची शिष्टाई सफल होण्याची चिन्हे दिसत आहेत. जुन्या पाणी पुरवठा योजनेची विहिर बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे बरेच दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद असून गेल्या तीन वर्षांपासून नविन विहिरीसाठी अंदाजे रुपये २२ ते २५ लाखाचा निधी मंजुर झालेला आहे, परंतु संबंधीत अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, असे त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामस्थांना पायपीट करावी लागते.

नविन विहिरीच्या अपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वी अर्ज दिल्यानंतर समजुत काढून काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यांत आले होते, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे उपसरपंच प्रभा वानखडे व ग्राम पंचायत सदस्य सुरज निंघोट आणि देवानंद किर्दक यांनी उपोषण सुरू केले आहे.