अकोला

युवक काँग्रेसच्या वतीने होणार कर्तबगार मातृशक्तीचा गौरव

अकोला: जागतिक महिला दिनाच्या पर्वावर महानगरात युवक काँग्रेसच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य मातृशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या महिला तसेच विपरीत परिस्थितीवर मात करीत संसाराचा गाढा स्वतः ओढणार्‍या मातृशक्तीचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.दि. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.

मातृशक्तीच्या प्रति असलेल्या सामाजिक दायित्वा चे भान ठेवीत आणि समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कावरे यांनी साकार केलेल्या या अभिनव उपक्रमात १०८ मातृशक्तींना साडी चोळी व स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार असून उपस्थित सर्वच महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी यावेळी भव्य लकी ड्रा सुध्दा आयोजित करण्यात आला आहे.

यात प्रथम पारितोषिक १ ग्राम सोन्याचे नाणे असून द्वितीय पुरस्कार ३० ग्राम चांदीचे नाणे व तृतीय पारितोषिक म्हणून २० ग्राम चांदीचे नाणे प्रदान करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची यावेळी रेलचेल राहणार आहे.स्थानीक जवाहर नगर परिसरातील राजे संभाजी पार्क येथे जागतिक महिला दिन पर्वावर दि.११ मार्च रोजी साय ६-३० वाजता हा मातृशक्ती सन्मान सोहळा होणार आहे.

आर्थिक दुर्बल व घरात एकट्याच संसाराचा गाडा ओढणार्‍या मातृशक्ती तथा कोणतेही मागे आर्थिक,सामाजिक, कौटुंबिक,राजकीय पाठबळ नसताना आपल्या कर्तबगारीने उद्योग,सेवा,कला, शिक्षण, सांस्कृतिक, वैद्यकीय आदी क्षेत्रात उंच भरारी घेऊन नावलौकिक प्राप्त करणार्‍या मातृशक्तींना प्रेरणास्रोत पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे.

युवक काँग्रेस द्वारा आयोजित या मातृशक्ती सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आ. सत्यजीतदादा तांबे,आ.धीरजभाऊ लिंगाडे,शिवानीताई वडेट्टीवार समवेत अनेक राज्यस्तरीय मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून या सोहळ्याच्या सफलतेसाठी आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे.

सत्कारमूर्तीं मातृशक्तींच्या निवडीसाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे.ही निवड समिती सत्कारमूर्ती महिलांची छाननी करून आपला अभिप्राय सत्कार समितीला देणार आहे.मातृशक्तींनी आपल्या संपूर्ण माहितीचा प्रस्ताव दि ६ मार्च पर्यंत सागर कावरे, रणपिसे नगर, अकोला येथे आपले प्रस्ताव सादर करून मातृशक्तीच्या या सोहळ्यात मातृशक्तीनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी संयोजक सागर कावरे, कॉंग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे,प्रदेश नेते डॉ अभय पाटील,प्रदेश इंटक नेते प्रदिप वखारीया,युका नेते एड महेश गणगणे,कपिल रावदेव,अंशुमन देशमुख,पंकज देशमुख,प्रवीण काळे उपस्थित होते.सोहळ्याच्या सफलतेसाठी धीरज देशमुख, सुजय ढोरे,अंकुश भेंडेकर,भुषण चतरकर, अभय ताले,तुषार गावंडे ,रोहन पाटील,राहुल कावरे,संकेत तांदळे,विनीत काळमेघ,योगेश नागलवाडे,वैभव इंगोले मेहनत घेत आहेत.