पुणे, 18 फेब्रुवारी : ‘युपीए’च्या काळात सरकारला धोरण लकवा मारला होता. याकाळात सर्वच स्वतःला पंतप्रधान समजत होते. तर मनमोहन सिंग यांना कुणीच पंतप्रधान मानत नव्हते असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला. पुण्यात शनिवारी ‘मोदी @20’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी शाह म्हणाले की, देशात 2004 ते 2014 या कालावधीत युपीए सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. सैनिकांना त्रास देत होते. विदेशातही आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना काही सन्मान नव्हता.
त्यानंतर देशात मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिले. देशात 2014 मध्ये भाजप सरकार आले तेव्हापासून आजपर्यंत सकारात्मक परिवर्तन घडून आले. मोदींचा राजकारण प्रवेश योगायोग नव्हता. मोदींची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून जी कारकीर्द आहे तर त्याआधीचा त्यांचा 30 वर्षांचा त्याग आणि तपश्चर्या हे सगळे लक्षात घेतले पाहिजे.
मोदीजी आमचे प्रेरणास्रोत कसे झाले ? त्यांनी काय काय केले ? कसा संघर्ष केला ? गरीबातल्या गरीब घरांमध्ये भाजपा कशी पोहचवली हे सगळे आपल्याला समजून घेतले पाहिजे असे शाह यांनी सांगितले. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती.परंतु, लोकांच्या समस्या सोडवण्याची कला त्यांच्याकडे आहे.
माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले. भारतमातेची सेवा करणे हाच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याचे शाह म्हणाले. गुजरातचा विकास त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केला त्याचा मी साक्षीदार आहे. ग्रामीण विकासाचे अध्याय आधी गुजरातमध्येच लिहिले गेले. विविध प्रकारचा विकास केला गेला. दहशतवादाला उत्तर दिले गेले. त्यामुळे मोदीजी 13 वर्षात एक आदर्श ठरत गेले.
मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आपल्या कार्यातून देश प्रगती करु शकतो आणि संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो हे शक्य आहे हे मोदींनी दाखवून दिले.
हा काळ भारताच्या राजकीय इतिहासातला सुवर्ण काळ आहे. गेली 70 वर्षे ज्या लोकांनी राज्य केले. त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज ती स्थिती नाही. गरीबांना घरे आणि गॅस दिला. मोदींच्या काळातच हे शक्य होऊ शकले असे शाह यांनी सांगितले.