goindwal-jail
क्राईम देश

मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये गँगवॉर:पंजाबच्या तरनतारण तुरुंगातील २ गुंडाचा मृत्यू

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या २ गुंडांची गोइंदवाल तुरुंगात हत्या झाली आहे. रविवारी तुरुंगात गँगवॉर अर्थात टोळीयुद्ध झाले. त्यात मनदीप सिंग तुफान व मनमोहन सिंग मोहना यांचा मृत्यू झाला. तर केशव गंभीर जखमी झाला. या तिघांच्याही डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता.

तरनतारनचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगजीत सिंग यांनी सांगितले की, तुरुंगातून आणलेल्या ३ जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला होता. तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, गँगस्टर मनदीप सिंग तुफानचा तुरुंगातील इतर कैद्यांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर कैद्यांनी जबर मारहाण करून त्याची हत्या केली.

या घटनेत ३ ते ४ कैदी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. गँगस्टर मनदीप तुफान हा जग्गू भगवानपुरिया गँगचा सदस्य आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लुधियानात मनदीप सिंग तुफान व मणि रईया नामक गुंडांवर गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही गुंड यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संदीप काहलॉनचे निकटवर्तीय आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी गुंड मनदीप सिंग तुफान व मणि रईया यांनी त्याच्या घराची १० दिवस रेकी केली होती. त्याची माहिती त्याने कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रारला दिली होती. त्यानंतर सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संपूर्ण कट रचण्यात आला होता.