अकोला

मुख्य मार्गावरील बंद पथदिवे बदलविण्याची मागणी

मुर्तिजापूर: शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी विद्युत लाईट बंद असल्यामुळे या ठिकाणी नवीन फोकस लाइटची व्यवस्था करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक बियाणी जीन ते रेल्वे गेट ते भगतसिंग चौक महाराजा हॉटेल जुनी वस्तीपर्यंत मेन रोडवर अनेक ठिकाणी लाइट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. यावेळी अनेक अपघातसुद्धा घडत आहेत. शहरात एकच मेन रोड असून तोही अतिशय रहदारीचा आहे. या रस्त्यावर पोल कमी असून त्यावर पॉवरचे लाइट लावलेले आहेत. त्यामुळे उजेड कमी पडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक पुलावर कमी पावर फोकस असून अंधार असल्यामुळे या रस्त्यावर जाणे-येणे करणे कठीण झाले आहे. नगर परिषदचे मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्याशी सुद्धा या विषयावर माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी चर्चा केली व तोडगा काढण्याची मागणी केली आहे. सच्या अनेक सण उत्सव समोर येत आहेत.

रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची मिरवणूक या मार्गांवर जात असून या ठिकाणी फोकस नसल्यामुळे अंधाराचा कोणीही गैरफायदा घेऊन समाजकंटकाकडून गैरकृत्य होऊ शकते. त्यामुळे या भागात तातडीने नवीन फोकस लाइट लावून नागरिकांना व वाहनधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याची प्रतिलिपी मुख्यमंत्री सचिव कक्ष, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर ठाणेदार यांना देण्यात आली आहे.