अकोला

मान्यातील भुयारी रस्त्यासाठीच्या उपोषणाची यशस्वी सांगता ; मागणी मान्य

माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या मध्यस्थीने झाली सांगता

मूर्तिजापूर,ता.२७ : तालुक्यातील माना येथे रेल्वे गेट दरम्यान सुरु असलेल्या भुयारी रस्त्याचे गेली तीन वर्षे रखडलेले काम पुर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी येथील उपसरपंच मंगेश वानखडे यांनी आजपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे आजच मागे घेण्यात आले.
माना गावात जाण्यासाठी रेल्वे गेटवरुन एकमेव रस्ता होता त्याठिकाणी रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपासून भुयारी मार्गाचे काम सुरु केले आहे, हे काम अत्यंत संथगतीने होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कच्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करुन देण्यात आली असली, तरी पावसाळ्यात या पर्यायी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली. त्या रस्त्यावरुन वाहने चालविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. माना, पोही लंघापूर व इतरही गावांना जाण्यासाठी रेल्वे गेट वरुन एकमेव मार्ग असल्याने ग्रामस्थांची कुंचबना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मान्याचे उपसरपंच मंगेश साहेबराव वानखडे यांनी आज सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपोषणाची दखल घेत मध्यरेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर उपोषणस्थळी पोचले. उपोषणकर्त्याशी चर्चा केली व लगेच तोडगा काढला. पर्यायी रस्त्याचे तात्पुरते काम दोन दिवसात करण्यात येईल. ८०० किमी भुयारी रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. पर्यायी रस्त्याची वाहतूक२६ जानेवारीपर्यंत सुरू होईल. गटार व नाल्याचे काम वाहतुक सुरू झाल्यानंतर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगेश वानखडे यांनी उपोषण मागे घेतले.