राजकीय

माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई  : ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे हातात भगवा घेत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली शिवसेनेची सूरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामामुळे प्रभावित झाल्यामुळेच पक्षप्रवेश करत असल्याचे भूषण देसाई यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही दबावाखाली किंवा चौकशीला घाबरून पक्षप्रवेश करत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे भूषण देसाई यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नमूद केले.

याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

मुलाचा पक्ष प्रवेश क्लेशदायक – सुभाष देसाई

यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई म्हणाले की, माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.