irrigation-department-akola
अकोला

महापालिकेकडे ७ महिन्यांची पाणीपट्टी थकीत: पाटबंधार्‍याची होणार बैठक

अकोला : महापालिकेकडे पाटबंधारे विभागाची सात महिन्याची पाणीपट्टी थकीत आहे. दरमहा ११ लाख रुपये पाणीपट्टीचा भरणा महापालिकेला करावा लागतो. महापालिकेसोबतच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या थकीत पाणीपट्टीबाबत पाटबंधारे विभागाने गुरुवारी बोलावलेली बैठक आता शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत काटेपूर्णा, वान हे दोन मोठे तर मोर्णा, निर्गुणा, उमा हे तीन मध्यम प्रकल्प आणि २४ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातून सिंचनासोबतच विविध शहराच्या पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा केला जातो. या घेतलेल्या पाणीपट्टीचा भरणा प्रत्येक पाणी पुरवठा योजनेला करावा लागतो.

जिल्ह्यात बिगर सिंचनात सर्वाधिक पाण्याची उचल महापालिकेला करावी लागते. काटेपूर्णा प्रकल्पातून दरवर्षी महापालिका २४ दशलक्ष घनमिटर पाण्याची उचल करते. एक दशलक्ष घनमिटर साठी महापालिकेला ५ लाख ५० रुपये पाणीपट्टी द्यावी लागते. महापालिकेसोबत अन्य पाणी पुरवठा योजनांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे.

या थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी यापूर्वी पाटबंधारे विभागाने बैठक घेतली होती.या बैठकीत थकीत पाणीपट्टीचा भरणा १५ फेब्रुवारीपर्यंत करण्याची सुचना पाटबंधारे विभागाने केली होती. मात्र १५ फेब्रुवारी पर्यंत थकीत पाणीपट्टीचा भरणा न झाल्याने पाटबंधारे विभागाने पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत पाणी पुरवठा योजनांना थकीत पाणीपट्टीचा भरण्या करण्याबाबत अल्टिमेटम दिला जाण्याची शक्यता असून थकीत पाणीपट्टीचा भरणा न केल्यास पाणी पुरवठा खंडीत केला जाण्याचीही शक्यता आहे. मार्च अखेरमुळे प्रत्येक विभागाने वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

महापालिकेने चालु आर्थिक वर्षात जुलै २०२२ पर्यंत पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही. मात्र ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंतची पाणीपट्टी महापालिकेकडे थकीत आहे. परिणामी महापालिकेकडे ३८ लाख ५० हजार रुपयाची पाणीपट्टी थकीत आहे.