अकोला

मन व महेश नदीपात्रात उभारली जात आहेत घरे

बाळापूर: कुठलीही परवानगी अथवा नियम न पाळता अगदी नदीपात्रातील पाण्यालगत घरांची उभारणी केली जात असताना पालिका प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न निर्माण होत असून, २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना नुकतीच या परिसरात घडली आहे.

बाळापूर हे जवळपास ५५ हजारावर लोकसंख्या असलेले शहर असून, शहरामधून मन व महेश या २ नद्या वाहतात. या नदीवर पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पाकरिता आवश्यक असणार्‍या पाण्यासाठी धरण बांधलेले आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असून, बाळापूर शहरातून वाहणार्‍या दोन्ही नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर आहे.

बाळापूर शहरातून वाहणार्‍या दोन्ही नद्याच्या तीरावर अनेकांनी घरे उभारली आहेत. उभारलेली घरे ही अगदी नदीपात्रातील पाण्यालगत असल्यामुळे केव्हा कुठला धोका निर्माण होईल याची खात्री नसल्यामुळे एखादेवेळी दुर्घटना होऊन हानी होऊ शकते. या परिसरातील दोन अल्पवयीन मुलांचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू होण्याची घटना नुकतीच काही दिवसापूर्वी घडली असताना नगरपालिका प्रशासन मात्र अशा गंभीर व धोकादायक बाबीकडे का दुर्लक्ष करीत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. निराश्रितांना घरे मिळावीत याकरिता नगरपालिकेद्वारे १ हजार ६५२ घरांचे बांधकाम करण्यात आलेले असून, त्यामधील अनेक निवासस्थाने खालीच असताना नदीपात्रात घरे बांधून राहण्याचा मोह कशासाठी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.