kusumagraj
लेख

भावस्पर्शी लेखनाचे धनी-कुसुमाग्रज

मराठी भाषेला महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या मोबाईल युगातील मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे.  ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अत्याधुनिक काळात आणि युवा साहित्य अकादमी विजेता लेखक प्रणव सुखदेव पर्यंत मराठी बोली आणि मराठी प्रादेशिक बोली असा फरक केला गेला असला तरी या दोन्हीमध्येही मराठी साहित्य निर्मिती ही विपुल झाली आहे. विपुलतेचे प्रमाण हे मराठी बोलीला एकदाच प्राप्त झाले नाही तर त्यासाठी प्राचीन मराठी वाङ्मयापासून ते आधुनिक मराठी वाङ्मयापर्यंतचा वारसा लाभला आहे. या वारसा परंपरेतील एक नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी मराठी कविता अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवली असली तरी त्यांनी आपल्या भाषेचा अभिमान राखताना इतर भाषांचाही त्यांनी मान ठेवला म्हणून भारत सरकारतर्फे त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.

कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’  साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने  २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१  जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असेही म्हणतात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १० एप्रिल १९९७  रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून १ मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतराने तो विस्मृतीत गेला. त्यामुळे १९९७  ला शासनाला पुन्हा परिपत्रक काढावं लागलं.  २८  एप्रिल ते ३०  एप्रिल १९९७ या तीन दिवशी विविध उपक्रम आयोजित करुन १  मे रोजी समारंभपूर्वक सांगता सोहळा करावा आणि त्याचदिवशी मराठी राजभाषा साजरा करावा असा निर्णय सरकारने घेतला.  सरकारच्या या निर्णयामुळे १ मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो.

marathi-bhasha-divas

‘मराठी राजभाषा दिन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिना’प्रमाणेच २१  फेब्रुवारी रोजी जागतिक ‘मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक पातळीवरील संस्थेनेच २१  फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दिवशी आपल्या मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी दरवर्षी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.

१ मे  रोजी साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’, २१  फेब्रुवारी रोजी साजरा होणारा ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी रोजी  साजरा करण्यात येत असलेला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हे तीनही दिन वेगवेगळे दिन विशेष आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे.

कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे  २७  फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते. त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा व कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात . तसेच ठिकाणी मराठी नाटके काव्य संमेलन व मराठी संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे . तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला खरा अर्थ प्राप्त होईल. जीवनलहरी ,किनारा, मराठी माती ,वादळवेल अशा प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. तसेच दुसरा पेशवा ,वीज म्हणाली धरतीला,नटसम्राट ,राजमुकुट ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

marathi-bhasha-divas

मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित आहे व त्यांची निर्मीती संस्कृत पासून झाली आहे . महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे . मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे. “माझ्या मराठीची बोलू कौतुके ,परी अमृतातेही पैजा जिंके ,ऐसी अक्षरे रसिके मेळविन’’ असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा ही जास्त आहे.

वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कादंबर्‍या अशा अनेक साहित्य आणि कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरुवात कवितेपासून केली . पुढे कथा कादंबरी ललित वाड्मयातील नावाजलेली साहित्य रचना यांच्या लिखाणातून अवतरत गेली. तसे पाहिले तर आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा खूप मोठा आहे .

आपल्या मराठी माती मराठी चित्रपट ,नाटक ,काव्य ,कविता इत्यादींचा फार मोठा वाटा आहे . अशा अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठी वारसा जपत आलेलो आहोत . आपल्या या मराठी मातीत अनेक संत होऊन गेले . संत रामदास, संत ज्ञानेश्वर ,संत तुकारामाचे अनेक संतांनी मराठी भाषेतून स्तोत्र, श्लोक लिहिले आणि लोकांना मानवी कल्याणाचा संदेश तर दिलाच त्याचबरोबर मराठी भाषेचा ठसा लोकांवर लोकांचा मनावर उमटवला . छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले.  एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीत घडले . गानसम्राज्ञी लता मंगेशकर ,सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर ,माधुरी दिक्षित, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, समाजसेवक अण्णा हजारे, समाज सुधारक बाबा आमटे तसेच उत्तम मराठी लेखक नाटककार पु ल देशपांडे यांसारखे अनेक रत्ने मराठी मातीतच घडली. पण या मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत . मायबोलीचा त्याग करून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहेत . इंग्रजी ही काळाची गरज आहे नक्कीच त्याबद्दल दुमत नाही पण .

त्यासाठी मराठी भाषेला विसरणे योग्य नाही . मराठी बोलणारा माणूस नोकरी-व्यवसाय उच्च शिक्षण या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे . तिथे जाऊन हिंदी-इंग्रजी सारख्या इतर भाषा शिकतो आणि बोलतो परंतु आपल्या  मराठी भाषेला आपण विसरत आहोत. त्या मायबोलीत आपण जन्मलो आणि आपल्याला घडवले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे . आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे ही सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी अशा गोष्टी मुळेच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल.

लेखिका

संजीवनी जाधव-पाटील,

सहाय्यक संचालक (माहिती),  कोकण विभाग, नवी मुंबई