BJP woman leader's husband commits suicide under train
अकोला

भाजप महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या

अकोला 18 फेब्रुवारी : अकोला जिल्ह्यातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या नयनाताई मनतकार यांचे पती अविनाश मनतकार यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

नागपुरातील अजनी भागात रेल्वेसमोर उडी घेत मनतकार यांनी आयुष्याची अखेर केली. अविनाश मनतकार हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या आणि अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नयना मनतकार यांचे पती आहेत. तेल्हारा तालुक्यातील मनात्री हे मनतकार यांचे गाव आहेय.अविनाश मनतकार हे तेल्हारा शहरातील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते.

त्यांचा तेल्हारा इथे पेट्रोल पंपही होता. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित झाले होते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी दुपारी मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात गेले. दुपारच्या सुमारास अविनाश यांनी त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे, असे म्हटले. त्यानंतर थोड्या वेळात येतो, असे सांगून ते ई-रिक्षाने निघाले. परंतु रात्र झाली तरी ते परतले नव्हते.

त्यात मोबाईलही त्यांच्याजवळ नव्हता. यामुळ नयना मनतकार यांनी आपल्या नातेवाईकांना अविनाश बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असताना मनतकार यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समजले. तत्पूर्वी म्हणजेच आत्महत्या करण्यापूर्वी मनतकार यांनी एक ‘सुसाईड नोट’ लिहिल्याचं समोर आलं आहे. यात भाजपाचे बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चैनसुख संचेती हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा मतदारसंघातून तब्बल सहा टर्म भाजपाचे आमदार होते. चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या ‘मलकापूर अर्बन बँके’च्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी आम्हा पती-पत्नीला फसवल्याचा आरोप त्यांनी ‘सुसाईड नोट’मध्ये आहे.

यासोबतच या प्रकरणाचा तपास करणारे अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्याकडून ३८ लाख रुपये उकळूनही आपल्याला मदत केली नसल्याचं सुसाईड नोटमध्ये मनतकार यांनी नमूद केलं. संपूर्ण संचालक मंडळाची चौकशी करण्याचं त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे. मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी बँकेत स्वतःचा भ्रष्टाचार लपविपण्यासाठी आम्हा पती पत्नी दोघांना फसवलं, व राजकीय दबाव आणून, सर्व यंत्रणा वापरून स्वतःच्या भष्ट्राचाराचा आरोप आमच्यावर लावला.

तरीही पोलिस यंत्रणेने बँक संचालकाची काहीही चौकशी केली नाहीये. या प्रकरणामध्ये संचालक मंडळ किती दोषी आहे, याची सखोल चौकशी करावी, चैनसुख संचेती व लखानी यांनी खोटे आरोप लावून दिलेल्या त्रासामुळे ‘मी’ माझे जीवन संपवून आत्महत्या करीत आहे. आणि याचा तपास करत असताना रामदास पेठ पुलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी माझ्या कडून ३८ लाख रूपये घेतले पण काहीही मदत केली नाही. असे सुसाईड नोट मध्ये नमूद आहे..