AAP-Akola
अकोला राजकीय

भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा:दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक केल्याचा नोंदवला निषेध

अकोला : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने कथित मद्य घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. या अटकेचा निनषेध करीत आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी दुपारी भाजप कार्यालयावर मोर्चा काढला.मे २०२० मध्ये, दिल्ली सरकारने विधानसभेत नवीन दारू धोरण आणले होते.

नवीन दारू धोरण लागू करण्यामागे सरकारने युक्तिवाद दिले होते. मात्र, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी नवीन दारू धोरणाबाबत मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. तसेच केजरीवाल सरकारने नव्या टेंडरनंतर दारू ठेकेदारांचे १४४ कोटी चुकीच्या पद्धतीने माफ केल्याचा आरोप भाजपने केला होता.

दरम्यान मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदीया यांना अटक केल्याचा निषेध म्हणून आपने सोमवारी आंदोलन केले. यावेळी आपचे पश्चिम विदर्भ संयोजक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य शेख अन्सार, संदीप जोशी, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, जिल्हा प्रवक्ता विजय चक्रे सहभागी झाले.केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार हिटलशाहीकडे वळत असल्याची टीका आपच्या नेत्यांनी आंदोलनादरम्यान केली. आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल. राजकीय दबावापोटी सरकारकडून कारवाई होत असल्याचा आरोपही नेत्यांनी केला.

जगात शिक्षण काय असते आणि गरिबांना शासकीय शाळेतून उच्च दर्जाचे शिक्षण कसे देता येते, याचे मॉडेल दिल्लीचे शिक्षण मंत्री तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मांडले. त्यामुळे जगात आम आदमी पार्टीची प्रतिमा उंचावली असून, केंद्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या भाजप ची देशा सह जगात नाचक्की झाली आहे , अशी टीका आपने केली. त्यामुळे भाजप प्रणित केंद्र सरकारने ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला.