Prakash Ambedkar
अकोला

भाजपात गेल्यावर स्वच्छ तांदळासारखा पांढरा शुभ्र होतो -प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखप्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रेल्वेचा डब्बा बाहेरुन जाळून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. तसेच, यावेळी मुसलमान कमळाला मतदान करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘गोध्राची दंगल प्रकरणी मी भाजपवाल्यांना चॅलेंज देतो की, माझ्यासोबत बसा… खुले आम… याचं कारण असं की, रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. पण तो बाहेरुन जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा डिझेल टाका, पेट्रोल टाका पण रेल्वेचा डब्बा बाहेरुन जळत नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो. म्हणजेच रेल्वेचा डब्बा आतून पेटवला जो कोणी आतमध्ये बसला असेल त्यानेच. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, इथे फसवेगिरीचं खूप मोठं षडयंत्र सुरु आहे.’ ‘यावेळी मला शंभर टक्के माहिती आहे की, मुसलमान कमळाला मतदान करणार नाही. कारण त्याला माहिती आहे की, मी आता मतदान केलं तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही,’ असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

‘कमळवाले आणि अर्धी चड्डीवाले जर मतं मागायला आले तर तुम्हाला दारू देऊ द्या…. मस्तपैकी प्यायची… कोंबड्या दिल्या तर मस्तपैकी खायच्या… महात्मा गांधी आपल्याकडे पाठवला तरी घ्यायचा पण मतदान कमळाला?’, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणताच लोकांमधून आवाज आला की, नाही करायचं. त्यावर बोलताना लोकशाही वाचली पाहिजे. ही लोकशाही वाचवायची असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका, पण त्यांना मतं देऊ नका, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘अर्धी चड्डी वाल्यांना आदिवासींची संस्कृती पटत नाही म्हणून आदिवासीच संपला पाहिजे, असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे माझी आदिवासींना विनंती आहे की, अर्धी चड्डी, फुल चड्डीवाल्यांपासून सावध राहा आणि त्यांच्या विरोधात उभे रहा,’ असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘एखादा भाजपात गेलात की, धुतल्या तांदळसारखा पांढरा शुभ्र होतो. हसन मुश्रीफ जर भाजपात गेले, तर भाजपवाले म्हणतील कारवाई चुकून झाली, त्यांच्याकडे काहीच मिळालं नाही.

हसन मुश्रीफ यांच्यासारखा स्वच्छ माणूस दुसरा कुणीच नाही.”काल हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली. मी स्वागत करतो पण सरकारला माझा सवाल आहे की, चार्जशीट कधी दाखल करणार? आतापर्यंत यांनी ४० जणांवर धाडी टाकल्यात, पण एकावरही एफआयआर दाखल केलेला नाही,’ असंही हसन मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, वंचितच्या आदिवासी मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी भागातील अलेवाडी येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाजपाचं वर्चस्व असलेल्या भागात हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.