Ranjit-Patil Akola
अमरावती

भाजपात अमरावती जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलाचे वारे

अमरावती, 20 मार्च  : नुकत्याच झालेल्या पदविधर निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या पराभवानंतर आता भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाची जबाबदारी नव्या खांद्यावर जाण्याच्या चर्चेने भाजपात जोर धरला आहे.

जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलण्यासाठी डॉ रणजीत पाटील यांचा पराभव कारणीभूत नसून दोन्ही पदावर असलेल्या नियुक्त्यांना तीन वर्षे पूर्ण झाल्यानेच हे नवे बदल होत असल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे नेते देत आहे. मात्र येत्या पंधरा ते वीस दिवसांत या दोन्ही जबाबदार्या नव्या व्यक्तीच्या खांद्यावर सोपविण्याची प्रकिया पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपातील सुत्रांनी दिली आहे. भाजपाच्या निवेदिता चौधरी दिघडे या सध्या जिल्हाध्यक्ष, तर किरण पातूरकर हे शहराध्यक्ष आहे. या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लावण्यासाठी भाजपातील गटागटाच्या राजकारणाने मोर्चेबांधणी सुरू केली अाहे. जिल्हाध्यक्ष पदाकरीता जयंत डेहनकर, रविराज देशमुख , प्रविण तायडे यांची तर शहराध्यक्ष पदाकरीता सुनिल काळे, सुनिल साहू, चेतन गावंडे, शिवराय कुळकर्णी, प्रणय कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र जिल्ह्यातील भाजपाची विस्कटलेली घडी बसवायची असेल तर पुन्हा एकदा माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांच्यावर भाजपाची जबाबदारी सोपवावी असा मतप्रवाह असलेल्या कार्यकर्त्यांची फळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी भाजपाचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्याची शक्यता लक्षात घेता भाजपातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. डॉ रणजीत पाटील यांच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी ने एक सदस्यीय समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावर चिंतन करूनच भाजपाच्या अमरावती च्या राजकिय जबाबदार्या निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यांच्या संमतीनेच होणार बदल

अमरावती जिल्ह्यातील भाजपाची राजकिय परिस्थिती बघता विद्यमान खासदार डॉ अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रविण पोटे, आमदार प्रताप अडसड, आमदार श्रीकांत भारतीय, तुषार भारतीय यांच्या सर्वसंमतीनेच जिल्ह्याच्या राजकारणात फेरबदल होतील अशी शक्यता आहे.