अकोला

भाजपला विरोधकांना संपवायचे आहे-माजी मंत्री फौजिया खान

अकोला: भारतीय जनता पक्षाला अन्य विरोधी पक्षांना संपवायचे आहे. यासाठीच लोकशाहीचे खांब कुमकुवत करण्याचे प्रयत्नही सुरु आहे, असा आरोप माजी मंत्री फौजिया खान यांनी केला.

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या जनजागरण यात्रे निमित्त त्या आल्या असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, शासकीय यंत्रणाचा गैरवापर सुरु आहे. एखाद्या विरोधकाकडे एखाद्या यंत्रणेचा छापा पडणार असेल तर ही बाब यंत्रणेच्या आधी काही नेते जाहिर करतात, यावरुन ही बाब सिद्ध होते, की सर्व काही पूर्वीपासून ठरलेले आहे.

एकीकडे भाजपकडून सर्वस्तरावर सर्व काही आलबेल आहे, असे भासवले जाते. यासाठी जाहिरांतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. प्रत्यक्षात परिस्थिती विरुद्ध आहे. सामान्य नागरिक महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचाराने त्रस्त झाला आहे.

महागाई गगनाला भिडली आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या आता या बाबी लक्षात येत आहेत. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालावरुन ही बाब स्पष्ट होते. तसेच मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास भाजपला फटका बसतो. ईव्हिएम मशिन मध्ये बिघाड करुन मतदान घेतले जाते, असा आरोपही त्यांनी केला.

जनजागरण यात्रेच्या निमित्ताने आम्ही राज्य, शहर, गावापर्यंत जावून सामान्य नागरिकांची मते जाणून घेत आहोत. यातून शासनाविरुद्धची सर्व सामान्य नागरिकांमधील चिडही बाहेर येतेय. त्यामुळे देशात पुढे निश्चितच बदल होणार आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला राज्य समन्वयक सुरेखाताई ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,महिला प्रदेशच्या आशा मिरगे, महिला प्रदेश संघटक मंदा देशमुख, महिला अध्यक्ष सुषमा निचळ, अब्दुल रहीम पेंटर, बुढन गाढेकर आदी उपस्थित होते.