अकोला

भगवंताच्या चिंतनातील संसार हा पारमार्थिक-हभप अशोक महाराज इलग

अकोला : संसारात राहून परमार्थ करता येत नसल्याचे बोलल्या जाते. संसारात भगवंताची प्राप्ती होऊ शकत नसल्याचाही उपदेशही केला जातो. मात्र तुकोबाराया समवेत अनेक संतांनी संसारात राहूनच परमार्थ केला आहे. साक्षात ईश्वरालाही प्रसन्न केले आहे.

त्यांचा संसार हा भगवंताच्या चिंतनातून केलेला संसार आहे. म्हणूनच तो खर्‍या अर्थाने परमार्थिक संसार असून मनुष्याने याच खर्‍या परमार्थरुपी संसाराची कास धरावी असा हितोपदेश शेवगाव येथील प्रख्यात कीर्तनकार हभप अशोक महाराज इलक शास्त्री यांनी केले.

संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समितीच्या वतीने हभप भागवताचार्य प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात स्थानीय कौलखेड मार्गावरील गायत्री नगर येथील मैदानात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात हभप अशोक महाराज इलक शास्त्री यांनी कीर्तनाचे तृतीय पुष्प सादर केले.ते म्हणाले, भगवंताच्या चिंतनात राहून जर संसार केला तर तो संसार न राहता परमार्थ होतो.दैनिक व्यवहार करीत असताना ईश्वराचे चिंतन सातत्याने करीत रहा.

अगदी सकाळी उठल्याबरोबर पहिला नमस्कार हा भगवंताला झालाच पाहिजे. संसारात खुशाल रहा. मात्र परमार्थ पण करा. तुम्ही ईश्वराच्या स्मरणात जर नसाल तर प्रपंचात चिंता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.संसारात राहूनच तुकोबारायांनी अजरामर अशी कल्याणकारी गाथा तयार केली. तथापि तुकोबारायांनी हे सर्व भगवंत करीत असल्याचे सांगितले. म्हणून कोणत्याही कर्माचे स्वतः श्रेय घेऊ नका. या श्रेयामुळे अहंकार निर्माण होतो व तो प्रपंचाला घातक ठरतो. परमार्थिक संसारात चांगल्या सवयी बळजबरीने लावा. कारण वाईट सवयी आपसूक येतात.

जीवनमुक्त अवस्थेला पोहोचण्यासाठी भगवंताचे स्मरण करा. नित्य गाथा वाचा.या गाथेत जीवनाचे सार एकवटले आहे.ते म्हणाले, मानव कल्याणासाठी संतांनी जिवाचे रान केले. खडतर कष्ट करीत जागृत गाथा निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, परमार्थाचे अचूक प्रशिक्षण हे संत देत असतात. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे रहावे हा मार्ग संत सांगतात. संताच्या सानिध्यातच जीवन सुखकर व सुखमय होते. संसाराच्या समस्या सुटतात.

आपण काहीतरी कार्यासाठी या जगात आलो ही मनीषा बळावते.नको त्या प्रवाहात त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. संताच्या स्पर्शाने जीवनाचा परिस होतो. संत सहवासात जीवनाचे कल्याण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ईश्वराने दिलेली वाणी ही अमृत असले पाहिजे. शब्द माणसाला बसवतात व समाजातून उठवितात. शब्दात सामर्थ्य असते.

शब्दाने अनर्थ होतात. ज्ञानेश्वर माऊली बोलली तर ज्ञानेश्वरी निर्माण होते. तुकोबाराय बोलले तर गाथा निर्माण होते. मात्र आपण बोलले तर समाजात वाद निर्माण होतात. म्हणून अशा बाबीवर निमंत्रण ठेवणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी आपल्या अमृतमय कीर्तनात सांगितले.दरम्यान कीर्तन महोत्सवात नित्य सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत हभप शोभाताई पवार यांच्या अधिष्ठानात सामूहिक गाथा पारायण होत आहे .या गाथा पारायणासाठी पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत.

किर्तन महोत्सव सकाळी ५ वाजता काकड आरती, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ होत आहे. मृदुंगाचार्य हभप चंद्रकांत महाराज बागल, हभप ज्ञानेश्वर महाराज यादगिरे यांना गायनाचार्य हभप कृष्ण महाराज खोडके आळंदी, किशोर महाराज लळे अकोला, दिलीप महाराज काळबागे यांची साथ संगत मिळत असून कीर्तनात उत्कृष्ट गायन होत आहे.सत्र प्रारंभी हभप अशोक महाराज इलग महाराज यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.