अकोला

भक्तीसाठी मनाची तयारी अत्यावश्यक-हभप जगन्नाथ पाटील

अकोला: मन हे चंचल व अस्थिर असून कधीही एका कार्यात न रमणारे आहे. मनाच्या या चंचलतेमुळेच कोणत्याही बाबी नीट होऊ शकत नाहीत. मनाच्या या चंचलतेमुळे मनुष्याला कष्टमय जीवनाची साथ संगत करावी लागते. ही साथ संगत करीत असताना त्याला अनेक अडीअडचणी व कठीणतेचा सामना करावा लागतो. तथापि संत हे मनाला स्थिर करून त्याच्यावर नियंत्रण ठेवतात.

त्याला प्रभू भक्तीत लावतात. म्हणून संत हे कष्टमय जीवनाला तारत असतात. जीवनाच्या शाश्वत हितासाठी व प्रभूला प्राप्त करण्यासाठी मनुष्याने मनावर नियंत्रण ठेवून या मनाला प्रभुभक्तीत रममान करण्याचा हितोपदेश मुंबई येथील कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज पाटील यांनी केला. जगद्गुरु तुकाराम महाराज बीज उत्सव समिती गायत्री नगरच्या वतीने कौलखेड मार्गावरील गायत्री नगरात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात कीर्तनाचे सातवे पुष्प भक्तांना अर्पण करताना हभप जगन्नाथ महाराज मनाच्या चंचलतेवर कीर्तन करीत होते. ते पुढे म्हणाले, शरीराचा थकवा हा जाऊ शकतो. मात्र मनाचा थकवा हा कसा जाणार ? याचा विचार होणे गरजेचे आहे. समाजात मनाच्या चंचलतेमुळे अस्वस्थता वाढत चालली आहे. माणसे म्हातारी दिसायला लागली आहेत. आता खायला भरपूर आहे पण भूकच लागत नाही. पूर्वी गोधडीवर चांगली झोप लागे मात्र आता डनलापच्या गादीवरही झोप लागत नाही.

महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण, १७ मार्च २०२३

रात्री झोप येत नाही,तर गोळ्या खाऊन झोपावे लागते. मानसिक अस्वस्थता वाढली आहे. स्वभाव बदलला आहे. आपण कर्माच्या आधीन कधी झालो हेच आता कळत नाही. म्हणून मनाच्या या विपर्यावस्थेवर भगवंताचे मानसिक चिंतन हेच एकमेव औषध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, तुकोबाराय हे स्वतःच्या मनाशी बोलतात. समाजात बोलणार्‍यांची संख्या वाढली आहे. ते बोलणे कल्याणकारी असेलच असे नाही.पण संत जेव्हा बोलतात तेव्हा ते सुभाषित होते. माणूस जगाशी बोलतो आणि ते बोललेच पाहिजे. तुम्हाला जगाशी बोलायचे असेल तर बाहेर पडलेच पाहिजे.योग्य वेळी बाहेर पडून समाजाशी बोलते झाले पाहिजे.

मात्र तुम्हाला जगाशी बोलायचे असेल तर बाहेर पडावे लागेल. देवाशी बोलायचे असेल तर त्याच्या दारात जावेच लागेल. साधुशी बोलायचे असेल तर साधनेत जावेच लागेल.म्हणून ज्याला स्वतःशी बोलायचे असेल त्याला एकांतात जावेच लागेल. अशा जाण्याने त्याला खर्‍या तत्त्वाची ओळख होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सत्रात त्यांनी उत्सव समितीच्या या लोकोपयोगी उपक्रमाची प्रशंसा करीत उत्सव हा परंपरा जतन करतो.वैष्णव पूजा ही आपली संस्कृती आहे. मागून पुढे आलेली ही परंपरा आणखी पुढे नेण्याचे काम समाजाने करावे. पूर्वी गावची मंदिरे ही वारकर्‍यांनी सांभाळली.सत्संगामुळे समाजाची मानसिक सुदृढता शाबूत राहिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.