ताज्या बातम्या मुंबई

बेस्ट लवकरच सुरू करणार वॉटर टॅक्सी! बस जमीन-पाण्यावर धावणार? उपक्रमाकडून चाचपणी सुरू

टीम, दैनिक राज्योन्नती
मुंबई : बेस्टच्या ताफ्यात अलिकडेच एसी डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून आता लवकरच मुंबईकरांना बेस्टच्या वॉटर टॅक्सीमधून सुद्धा प्रवास करता येणार आहे. जमीन आणि पाणी दोन्हीकडे धावणाऱ्या वॉटर टॅक्सीच्या पर्यायाची बेस्टकडून चाचपणी सुरू आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सहकार्याने ही चाचपणी होणार आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून हा पर्याय सुरू करण्यात येणार आहे. याचा अहवाल बेस्टला मार्चपर्यंत अपेक्षित आहे. यानंतर बेस्टकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. जूनपर्यंत ५०० टॅक्सी ताफ्यात दाखल करण्याचे बेस्टचे उद्दीष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती यानुसार ही संकल्पना पुढे आली आहे. बेस्टच्या या वॉटर टॅक्सी सेवेमुळे इंधन बचत आणि प्रदूषण कमी होईल. तसेच प्रवाशांना एक नवा पर्याय सुद्धा उपलब्ध होईल. हा या मागचा हेतू आहे. प्रदूषण आणि इंधन समस्येवर तोडगा काढण्यासाठी वॉटर बसचा पर्याय निवडण्याची सूचना गडकरी यांनी उपक्रमाला केली होती यानंतर अशा बसची चाचपणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.
२२२ बस हायड्रोजनमध्ये परावर्तित करणार
विदेशात पाण्यावर आणि जमिनीवर चालणाऱ्या बसेस सेवेत आहेत. काही वर्षांपूर्वी एमटीडीसीने सुद्धा याच धर्तीवर अशा बस सेवेत आणण्याचा निर्णय घेतला होता परंतु हा प्रकल्पनंतर मागे पडला. बेस्ट उपक्रमाने पहिल्या टप्प्यात डिझेलवरील २२२ बस हायड्रोजनमध्ये परावर्तित करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच जमिनीवर आणि पाण्यावर चालणाऱ्या बसच्या पर्यायावर सुद्धा अभ्यास सुरू आहे.