Sanjay-Rathod
राजकीय

बनावट इंजेक्शन प्रकरणी बारा जणांवर गुन्हा; कठोर कारवाई करणार – मंत्री संजय राठोड

मुंबई : मुंबईतील सैफी रूग्णालय शेजारील औषध विक्री दुकानातून बनावट इंजेक्शन विक्री करण्यात आली. एका रुग्णाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण अन्न व औषध विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिले.

प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुंबईतील सैफी रुग्णालयाच्या बाजूच्या औषध विक्री दुकानातील बनावट औषधे आणि इंजेक्शनचा मुद्दा मांडला होता. अभिजीत वंजारी, अनिल परब यांनी, बेकायदा औषध निर्मितीवरून सरकारवर टीकेची झोड उठवली.

सैफी रुग्णालयाच्या मेडिकल मध्ये घेतलेल्या इंजेक्शन मुळे मंत्रालयात काम करणारे विवेक कांबळे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात केलेल्या तपासणीत, संबंधित मेडिकलमध्ये मोठा साठा मिळाला. परंतु, औषध निर्मिती आणि विक्री केल्याची कुठेही नोंद आढळली नसल्याची धक्कादायक बाब विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या निदर्शनास आणून दिली. दानवे म्हणाले की सुमारे चार हजार पाचशे बनावट विक्री झाली आहे. मुंबईत अशा प्रकार वाढले असून ऑनलाईन विक्री सुद्धा होत आहे. ग्रामीण भागात देखील अशाच पद्धतीने बनावट विक्री होत असल्याचे दानवे म्हणाले. आमदार अनिल परब यांनी मुंबईतील बनावट औषध विक्री करणाऱ्यांची साखळी संघटित गुन्हेगारी आहे. याला मोक्का कायदा लावावा आणि संबंधित मृत्यू प्रकरणी दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

मंत्री राठोड यांनी यावर विधान परिषदेत खुलासा केला. बनावट औषध आणि गोळ्या विक्रीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील विक्रेत्यांनी – उत्पादकांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सुमारे एक लाख 18 हजार परवाने दिले आहेत. त्यामध्ये 98 हजार किरकोळ, 28 हजार 855 घाऊक विक्रेते आणि 996 उत्पादकांचा समावेश आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या तपास मोहिमेत 2450 परवाने निलंबित आणि 552 परवाने कायमच रद्द केले आहेत. तसेच मुंबईतील सैफी रुग्णालया शेजारील मेडिकल दुकानातून विक्री केलेल्या इंजेक्शनबाबत अनेकांची चौकशी केली. त्यामध्ये बारा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मंत्री राठोड यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट औषध विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे उखडून टाकू, असे ही ते म्हणाले.