विदर्भ

बदली झालेले पोलीस निरीक्षक कार्यमुक्त!

– स्था.गु. शाखेचा प्रभार नितीन शिंदेंकडे,– वाहतूक शाखेचा प्रभार संजय खंदाडे यांच्याकडे 

प्रतिनीधी १७ऑगस्ट :-अकोला पोलीस दलातील
जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागेवर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली.
अकोला जिल्ह्यातील चार ठाणेदारांसह काही पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून व प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली. त्यात जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांची ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाल्याने त्यांचा प्रभार नियंत्रण कक्षात कार्यरत श्रीरंग सणस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेस सपकाळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात विनंतीवरून बदली करण्यात आली. त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांची प्रतिबंधक कार्यवाहीकरिता तर सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांची प्रतिबंधक कार्यावाही वगळता इतर जबाबदारीसाठी नियुक्ती करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी दिला आहे. याशिवाय शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांचीही विनंतीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांनाही कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांच्या जागेवर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे.