80 वर्षांचा म्हातारा बच्चू कडूंना भिडला!
धाराशिव : तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या पण तुम्ही अयोग्य वर्तन केलं. शिंदे फडणवीस महाडाकू आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात. तुमच्याकडून असं वर्तन अपेक्षित नव्हतं. यासाठी आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांचा समाचार धाराशिवच्या 80 वर्षीय अर्जुन घोगरे या शेतकऱ्याने घेतला.
यावेळी शेतकऱ्याने काही मिनिटे बच्चू कडू यांची गाडी रोखून धरली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बच्चू कडूंच्या गाडीचा मार्ग मोकळा झाला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपच्या साथीने वेगळी चूल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचत शिंदे यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या काही भागांत उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे तर शिंदे यांच्यासह गेलेल्या आमदारांविषयी काहींच्या मनात रोष आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका लग्नसमारंभात आपल्याला 50 खोके एकदम ओक्के… म्हणून डिवचतात अशी खंत खुद्द बच्चू कडू यांनी बोलून दाखवली होती. जाईल तिथे लोक गद्दारीच्या भावनेतूनच बघतात, असंच त्यांना सूचित करायचं होतं. आजही धाराशिव दौऱ्यावर असलेल्या बच्चू कडू यांना तेथील एका शेतकऱ्याच्या रोषाचा सामना करावा लागला. शेतकऱ्याने बच्चू कडू यांना सुनावलं महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही का त्रास दिलात…? तुमच्याकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं, असं तावातावाने शेतकरी बोलू लागला.
80 वर्षांचा वृद्ध बच्चू कडूना म्हणाला तुम्ही "डाकू" सोबत गेलात#BacchuKadu #maharashtra #eknathshinde #devendarfadanvis #bacchukadu pic.twitter.com/Ig1K69NByx
— Azroddin Shaikh (@azars_007) February 28, 2023
तेव्हा बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेतकऱ्याने मीडियाला पाचारण करत `माझा आवाज रेकॉर्ड करा`, अशी सूचनाच केली. त्यावर बच्चू कडू हलकेसे हसले. मग शेतकऱ्याने आपली `मन की बात` सुरु केली. राज्यात जे काही घडलं ते बरोबर नव्हतं. तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. पण तुम्हीही त्या फडणवीस आणि शिंदे या डाकू बरोबर गेलात. घटनेची पायमल्ली केलीत.
यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं का? अशी विचारणा अर्जुन घोगरे या शेतकऱ्याने बच्चू कडू यांना केली. शेतकरी बोलायचं थांबत नाही हे पाहून तिथे उपस्थित प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याला समजवायचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. मग बच्चू कडू यांनी गाडीत बसण्याचा निर्णय घेतला. तरीही शेतकऱ्याने बच्चू कडू यांची पाठ सोडली नाही. शेवटी बच्चू कडू उत्तर देत नसल्याचं पाहून त्याने गाडीच रोखून धरली. शेतकऱ्याच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला अन् मग बच्चू कडू यांची गाडी भरधाव वेगात निघून गेली.