मुंबई, 22 फेब्रुवारी : मागील वर्षी मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांना मनोरंजनात्मक, वैविध्यपूर्ण आशयाचे अनेक चित्रपट दिले. त्यापैकीच पॉंडीचेरी , तमाशा लाईव्ह, सहेला रे. या प्रत्येक चित्रपटाची काहीतरी खासियत आहे.
स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘पॉंडीचेरी’ हा भारतातातील पहिला चित्रपट ठरला असून पत्रकारांची ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची पळापळ, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा अधोरेखित करणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगीतिक मेजवानी आहे.
चित्रपटाची संपूर्ण कथा ही गाण्यांच्या माध्यमातून पुढे जाते. तर आयुष्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना गृहीत धरत नात्यातील हरवून गेलेला गोडवा पुन्हा मिळवण्यासाठीची ‘ती’ची धडपड ‘सहेला रे’ मध्ये दिसत आहे.
असे विविध जॉनरचे हे चित्रपट प्रेक्षकांना एकाच ठिकाणी म्हणजेच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहेत. ज्यांचे प्लॅनेट मराठीचे सबस्क्रिप्शन आहे त्यांना हे चित्रपट पाहता येतीलच. याव्यतिरिक्त हे चित्रपट व्हिडिओ ॲान डिमांड अंतर्गत असल्याने एक ठराविक रक्कम भरून आपल्याला आवडणाऱ्या चित्रपटांचा प्रेक्षकांना इथे आनंद घेता येणार आहे.
या तिन्ही चित्रपटांचे प्रस्तुतकर्ता अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘पॉंडीचेरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले असून या चित्रपटात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, नीना कुळकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तर ‘सहेला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी प्रमुख भूमिकेत आहेत.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’मागील काही काळापासून मराठीतही नवनवीन विषय हाताळले जात आहेत, काही तांत्रिक प्रयोग केले जात आहेत.
विशेष म्हणजे या सगळ्याचा प्रेक्षक स्वीकार करत आहेत आणि त्यामुळेच आम्हालाही काहीतरी नवीन आशय निर्माण करण्याची इच्छा होते. काही कारणास्तव प्रेक्षकांचे हे चित्रपट पाहण्याचे राहून गेले असेल तर आता हे चित्रपट प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहेत. उत्तमोत्तम मनोरंजनापासून प्रेक्षक वंचित राहू नये, म्हणून हा आमचा प्रयत्न.”