अकोला: अंत्योदय अभियानातंर्गत अनाथ मुले व बालकामगारांच्या सक्षमीकरणासाठी दहा दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील २१ अनाथ व बालकामगार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवसंकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली.
या संधीचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थ्यांनी उद्योग निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राव्दारे जिल्ह्यातील अनाथ मुले व बालकामगारांच्या सक्षमीकरण व नवउद्योजक निर्माण होण्यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दि.१६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले. यात विविध उद्योगाची माहिती, उद्योगाची निवड, कर्जाच्या योजना, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, व्यवस्थापन इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कामगार आयुक्त राजेश गुल्हाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा समन्वयक प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थ्यांना उद्योग निर्मितीकरीता आवश्यक बाबींची पुर्तता करुन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधितांना दिले. उद्योग उभारण्यासाठी प्रशासनाव्दारे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशिक्षणार्थ्यांना दिले. प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन प्रशिक्षणात मिळालेल्या मार्गदर्शनाबाबत प्रशासनाचे आभार मानले.