अकोला

प्रभू प्राप्तीसाठी या युगात नामस्मरण श्रेष्ठ-हभप पुंडलिक महाराज जंगले

अकोला: तुकोबाराय म्हणतात, भगवंत प्राप्तीसाठी कलियुगात योग, व्रत, कर्म, उपासना,प्रार्थना, कर्मकांड आदी प्रकार क्लिष्ट असून अशा प्रकाराने भगवंत प्राप्त होऊ शकत नाहीत. भगवंत प्राप्तीचा एकमेव उपाय म्हणजे नामस्मरण होय. कारण कलियुगात ज्ञान, आयुष्य व आरोग्य हे अल्पजीवी आहेत.

म्हणून अशा दीर्घ परंपरेच्या क्रिया न करता साधी सरळ नाम स्मरणाची क्रिया करून भगवंताला प्राप्त करण्याचा हितोपदेश डोंगरगण येथी प्रख्यात कीर्तनकार हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी केला.संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती च्या वतीने हभप भागवताचार्य प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात स्थानीय कौलखेड मार्गावरील गायत्री नगर येथील मैदानात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी कीर्तनाचे चतुर्थ पुष्प सादर केले.ते म्हणाले, हा उपदेश केवळ तुकोबारायांच्या गाथेतच नव्हे, किंबहुना भागवत व गीतेत ही आहे.यात नाम संकीर्तनाची उकल केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नाम साधना ज्यांनी स्वीकारली त्यांना प्रभूप्राप्ती झाली.गोरोबा, सावता, चोखा,तुकाराम आदी संत परंपरेत नाम संकीर्तनाला मोठे महत्व दिल्या गेले आहे.

ही नाम साधना करण्यासाठी लौकिक व्यवहार,शेती, व्यापार, मजुरी आदी कोणतीही कामे करत असतानाही नाम साधना करता येते. गाथेत नाम संकीर्तनाच्या संदर्भात तुकोबारायांनी मोठा उहापोह केला आहे. त्यांनी कोणतेही सोंग न करता वानप्रस्थ, संन्यासी सारखे जीवन न जगता, देशांतर, देशांतर, भाषांतर न करता अगदी आपले दैनिक कर्तव्य पार पाडूनही नाम चिंतनाने भगवंत प्राप्ती करता येते.जर या पलीकडे काही केले तर ते व्यर्थ होणार असल्याचा इशाराही तुकोबारायांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. नाम स्मरणाची महती सांगताना ते म्हणाले की,कलियुगात सर्व काही अल्प वेळेचे आहे.मानवी आयुष्य ही अत्यल्प आहे. अशा अत्यल्प चक्रात दीर्घ व्रते वैकल्ये न करता साध्या सरळ नामस्मरणाच्या पद्धतीने भगवंताला प्राप्त करता येते. हाच कित्ता संतांनी गिरवला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हभप जंगले महाराज यांनी गाथेची ही महती या सत्रात विशद केली. वारकरी संप्रदायात गाथेला सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. ज्याने गाथेचे पारायण केले त्याने साक्षात वेदाचे पठण केले असल्याची शक्ती या गाथेत आहे. गाथा हा दुसरा तिसरा काही नसून पंचम वेद आहे.अठरा पुराणे, चार वेद यांचे संपूर्ण सार एकट्या गाथेत सामावलेले आहे. तुकोबारायांची गाथा ही ब्रह्मसूत्र असून त्यात प्रत्येक अभंगात सूत्र सामावलेले आहे. एवढेच नव्हे तर तुकोबारायांची गाथा ही साक्षात गीता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गाथेत व वेदात वर्ण, उत्पत्ती व फल सादृश्य आहे. जे जे वेदात वर्णीत आहे. ते ते या गाथेत आहे.जो वेदात अर्थ सांगितला तोच गाथेत सांगितला आहे.

परमात्मा पासून वेदाची निर्मिती झाली तशी गाथेची निर्मिती ही भगवंतापासून झाली. तुकोबाराय हे साक्षात भगवंत असल्याचे ते म्हणाले.गाथा ही जीवन बदलणारी प्रक्रिया आहे. या गाथेचे नित्य वाचन व श्रवण करण्याचे आवाहन हभप पुंडलिक महाराज जंगले यांनी यावेळी केले.या कीर्तन महोत्सवात आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ट व्यवस्था केली असून प्रवेश दाराजवळ संत गजानन महाराजांची मूर्ती साकार करण्यात आली आहे. दूरवरून येणार्‍या भाविक भक्तांच्या बसण्याची व पिण्यासाठी शितल जलची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

कीर्तनात दूरवरूनही भाविक उपस्थित होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.सत्र प्रारंभी हभप पुंडलिक महाराज जंगले यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.शुक्रवार दि १७ मार्च पर्यंत नित्य रात्री ८ ते रात्री १० पर्यंत चालणार्‍या या कीर्तन महोत्सवात दि १४ मार्च रोजी सोपान महाराज काळपांडे मूर्तिजापूर यांचे कीर्तन होणार असून दि १५ मार्च रोजी हभप जगन्नाथ महाराज पाटील मुंबई,दि १६ मार्च रोजी वारकरी भूषण हभप उमेश महाराज दशरथे परभणी यांचे कीर्तन होणार आहे.