ताज्या बातम्या मुंबई

पोलीस आयुक्त जयजित सिंह हे जनरल डायर आहेत का ?

मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात !

माजी खासदार आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह हे जनरल डायर आहेत का ? असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे इाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली ठाणे पोलीस काम करत आहेत असा गंभीर आरोप शनिवारी एका पत्रकार परिषदेत केला.

१५ फेब्रुवारी रोजी ठामपाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक ऑडिओ क्लीप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये महेश आहेर यांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि जावई यांची सुपारी दिल्याबद्दलचा संवाद साधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी महेश आहेर हे घरी जात असताना पालिका मुख्यालयाबाहेर त्यांना चोप दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 307,353 सह विविध कलमे लावून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे निरीक्षण नोंदविले आहे. ३०७ कलम लावला कसा ? जितेंद्र आव्हाड यांचे नाव मुद्दाम दिल्याचे न्यायालयाचे निरीक्षण असल्याची माहिती परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘खोटे गुन्हे दाखल करण्यात ठाणे पोलीस आघाडीवर आहेत. पोलीस आयुक्तांचे सहकारी अतिरिक्त पोलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले हेदेखील या कामात पुढाकार घेत आहेत. हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दबावाखालीच होत आहे. त्यांच्या थेट इशार्‍यावरच हे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शुक्रवारी विधानसभेत डॉ. आव्हाड भाषण करीत असताना मुख्यमंत्र्यांनी ‘तुमची अजून एक केस माझ्याकडे चौकशीला आलेय’ असे विधान केले. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की मुख्यमंत्री पोलिसांच्या नावाने आम्हाला घाबरवत आहेत. पण, आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही राजकीय कार्यकर्ते असून वैचारिक लढाया लढतोय. तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही, असेही परांजपे म्हणाले.