क्राईम

पोलिसांच्या खबऱ्याअसल्याच्या संशयावरून मारहाण करणाऱ्या दोघांना कारावास

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अकोला प्रतिनिधी३०ऑगस्ट:-पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली होती. या खटल्याचा निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायाधीश (तिसरे) यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल सोमवारी दिला. प्रमोद गंगाराम कोथळकर व विलास सिद्धार्थ शिरसाट असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रमोद कोथळकर याच्या घरून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली होती. आपल्याकडे दुचाकी असल्याची माहिती निलेश सुरेश पवार यानेच पोलिसांना दिली. असा संशय प्रमोद कोथळकर याला आल्याने तो व त्याचा सोबती विलास सिद्धार्थ सिरसाट दोघे ४ फेब्रुवारी २०११ रोज संध्याकाळी ५ वाजता नीलेश पवारच्या घरी लोखंडी रॉड व तलवार हातात घेउन गेले व त्याच्यावर हल्ला केला. भांडणाचा आवाज ऐकून नीलेश पवार यांचा भाऊ राकेश पवार व आई मंगला पवार हे घरातून बाहेर आले असता त्यांनासुध्दा मारहाण करून जखमी केले होते. अशा रिपोर्टवरून दोन्ही आरोपीविरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात भांदविचे कलम ३०७, ३२३,५०४,५०६,४४७ व आर्म अॅक्ट ४,२५ नुसार गुन्हे दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश(तिसरे) डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयात चालली. सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले व साक्षीदारांच्या साक्ष या ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपीस भांदविचे कलम ३२४ नुसार दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त चार महिने शिक्षा व कलम ३२३ नुसार सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंडांची शिक्षा व दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.