महाराष्ट्र

पुण्याहून आलेल्या वऱ्हाडाच्या बसला भीषण आग

टीम, दैनिक राज्योन्नती
सोलापूर : पुण्याहून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब इथे आलेल्या वऱ्हाडाच्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यावेळी वऱ्हाड बसमधून उतरल्यानंतर अचानक बसला भीषण आग लागली आणि विवाह मंडपात अग्नितांडव सुरू झाला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस जळून खाक झाली आहे. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

नेमके काय घडले?
पुण्याहून नवरदेवाचे वऱ्हाड शुक्रवारी रात्री खासगी बसमधून सोलापुरात आले होते. वऱ्हाडी मंगल कार्यालयात उतरताच थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. यावेळी नागरिकांनी बसमध्ये बसलेल्या चालकाला तातडीने खाली उतरवून बस विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच शेजारील असणारे सर्व वाहने हलवली आणि नागरिकांच्या या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच त्याच रात्री बस विझवण्यात यश आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून बस जळून खाक झाली आहे.