पुणे२१सप्टेंबर:-अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप,वाकड येथील बॉडीमसाज करण्याच्या नावाखाली, देहविक्री अशा प्रकारच्या घटना ताज्या असतांना,पुण्यातील लोणी काळभोर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्याना जवळ, एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय उर्फ गुलशन रोहिदास मोरे असे २३वर्षीय खून झालेल्या तरुणाचे नांव आहे.मृतक गुलशन मोरेचा भाऊ रोहित मोरे याने दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी आहे की,विजय मोरे हा खोदकामाचे मिळेल तेथे मजुरी काम करत होता. त्याला दोन वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन होते. विजय हा आईसह रहात होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ व पत्नी, मुलगी राहतात. विजय रविवारी रात्री साडेदहा वाजता अर्ध्या तासात जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर गेला होता. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे त्याची आई कांताबाई मोरे यांनी सकाळी रोहित याला सांगितले.रोहित त्याला शोधायला बाहेर गेला. तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या विनोद जाधव याने पाण्याच्या टाकीजवळ विजय बेशुद्धावस्थेत पडला असल्याचे सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर रक्त आलेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.