ताज्या बातम्या

*पाण्यात युरीया कालवून शिकार प्रकरणी 3 आरोपी अटकेत* *12 माकडे, 1 नीलगाय, 1 काळवीट, 2 पक्षी मृत*

 

 

प्रमोद कढोणे पातूर :  08 जून रोजी आलेगांव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिपरडोळी भाग 2 नियतक्षेत्रातील राखीव वनामध्ये गस्ती दरम्यान 12 माकडे, 1 निलगाय, 1 काळविट, 1 पक्षी इत्यादी मृतावस्थेत आढळून आले.
सदरील प्रकरणी पंचनामा नोंदवून गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच मृत निलगायीचे मागील पाय व मुंडके शिकारीच्या उद्देशाने कापुन नेल्याचे आढळले. शिकारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, वनक्षेत्रानजीकच्या शेतामध्ये आरोपी नामे मधुकर कचरु लठाड, वय 65 वर्ष यांचे शेतात शोध मोहिम राबवली असता, शेतामधुन रक्ताने माखलेली सुरी, रक्ताने माखलेले दगड, लाकडाचा तुकडा इ. साहित्य हस्तगत करण्यात आले. व आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आरोपीने चौकशी दरम्यान गुन्हा कबुल करून नैसर्गीक पाणवठ्यात युरीया कालवुन शिकार केल्याचे व निलगायीचे मांस खाण्याच्या उद्देशाने कापुन नेल्याचे सांगीतले. तसेच त्याच्या सोबत इतर 2 साथीदार नामे गोविंदा झांगोजी ससाने वय 60 वर्ष व संतोष वसंता ससाने वय 37 वर्ष सर्व रा. नवेगांव ता. पातुर जि. अकोला असल्याचे सांगीतले. त्यानुसार इतर 2 आरोपींना त्यांचे राहत्या घरातुन ताब्यात घेवून दिनांक 10/06/2022 रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपींनी गुन्हयाची कबुली देवुन ते नियमीतपणे वनक्षेत्रात जावुन शिकारी करत असल्याचे सांगीतले. दिनांक 10/06/2022 रोजी आरोपींना मा. प्रथम श्रेणी न्यायालय, पातुर येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली.
सदरील कार्यवाही अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. के. अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक श्री. सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगांव श्री. विश्वनाथ चव्हाण, वनपाल पिंपरडोळी वर्तुळ श्री. दादाराव इंगळे, वनपाल आलेगांव वर्तुळ श्री. देंगे, वनपाल मळसुर वर्तुळ श्री. भागवत, श्री. बि. व्ही. थोरात, लखन खोकड, साळवे, बिरकड, अलाट, गायगोळ, तायडे, पाटिल, वनमजुर जाधव, इंगळे यांनी केली. सदरील प्रकरणाचा पुढिल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विश्वनाथ चव्हाण करीत आहेत.आलेगांव वनपरिक्षेत्रांतर्गत अतिशय क्रूर पध्दतीने पाण्यात युरीया कालवुन वन्यप्राणी व पक्षी यांची हत्या करण्यात आलेली आहे. सदरील प्रकरणी आरोपीकडून इतर शस्त्रे सापळे हस्तगत करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच इतर आरोपी सहभागी आहेत का? याचा तपास सुरु आहे. सर्व आरोपींवर भारतीय वन अधिनीयम, 1927 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.- विश्वनाथ एस. चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) आलेगांव