ताज्या बातम्या मराठवाडा

परभणी येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदं निर्मितीसह ९७.६० कोटी खर्चास मान्यता मान्यता

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई प्रतिनिधी : परभणी येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदं निर्मिती सह ९७.६० कोटी खर्चास मान्यता देण्यात आली असून या बाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

परभणी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यास संलग्नित जवळपास ४३० रुग्ण खाटांचे नवीन रुग्णालय स्थापन करण्यास गेल्या वर्षी मार्च महिन्यात मान्यता देण्यात आली होती मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्य बळ निर्मिती, जागेचा प्रश्न तसेच त्यापोटी येणाऱ्या खर्चास मान्यता मिळाली नव्हती.

या अभावी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, ही बाब विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यानुसार प्रशासकीय स्तरावर सर्व त्या सर्व बाबींची पूर्तता झाल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनानुसार १००० लोकसंख्येमागे एक डॉक्टर आवश्यक आहे. मात्र सध्य स्थितीत राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना आरोग्यविषयक सोयीसुविधा देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.

याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुतांश डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

ही बाब विचारात घेता परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याने दरवर्षी नवीन 100 प्रशिक्षित डॉक्टर राज्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार होतील.

मराठवाड्यातील परभणी येथे ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू झाल्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषयक चांगल्या सोईसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत होत जात आहे.