Godavari-rajesh-Khillare
अकोला ताज्या बातम्या

पदरात १५ दिवसांचे बाळ, २५ वर्षीय माऊलीने रुग्णालयाच्या बाथरुममध्येच स्वत:ला संपवले

अकोला : अकोला जिल्हा सर्वोपचार (शासकीय) रुग्णालयातील वॉर्ड नंबर २३ मध्ये आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे या महिलेचे १५ दिवसांचे बाळ देखील येथेच भरती आहे.

मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी महिलेला मानसिक त्रास दिल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. आता तिची मुलगी न्यायलाही महिलेचे कुटुंबीय तयार नसल्याचेही शासकीय रुग्णालयातील सुरक्षा निरीक्षकांचं म्हणणं आहे.अकोला शासकीय रुग्णालयात आज शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली.

वाशिम येथील पंचशील नगर येथील २५ वर्षीय गोदावरी राजेश खिल्लारे अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आली होती. तिथे तिने मुलीला जन्म दिला. या महिलेचं बाळ १५ दिवसांचं असून ते अकोला सर्वोपचार रुग्णालय येथील ‘सीसीयू’मध्ये भरती आहे. तेव्हापासून महिलेजवळ तिची मावशी आणि भाऊ रुग्णालयात होता.

दरम्यान, गोदावरी १५ मार्चपासून हरवली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. १७ मार्च रोजी सकाळी सफाई कामगार संपावरुन कामावर परतले असता वॉर्ड क्रमांक २३ चे बाथरूम तुटलेले दिसले.

कर्मचार्‍यांनी आत डोकावून पाहताच एका महिलेचा मृतदेह फासावर लटकलेला दिसला. मृतदेह कुजल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने तातडीने तेथे दाखल असलेल्या सर्व बालकांना दुसर्‍या वॉर्डात हलवले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. सासरच्या मंडळींनी गोदावरीला मानसिक त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

याबाबत अधिक तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत. आता या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मृत महिलेचा भाऊ महादेव भोंगळ याने केली.

गोदावरी मृत्युमुखी पडल्याची माहिती तिच्या भावाने सासरच्या कुटुंबियांना दिली, पण कुणीही यायला तयार नव्हतं. आम्ही येत नाही, अन् तिची मुलगीही नेत नाही, असं उत्तर त्यांनी दिल्याचा दावा भावाने केला आहे.

गोदावरीला मुलगी झाल्यामुळे तिला घरात कुठेतरी त्रास असावा, त्यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता अकोला सर्वोपचार रुग्णालयातील सुरक्षा निरीक्षक गणेश गणे यांनी वर्तविली आहे.१५ मार्चपासून गोदावरी बेपत्ता असल्याची तक्रार आमच्याकडे तिच्या सासुने दिली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता.

दरम्यान आज सकाळी जीएमसी प्रशासनामार्फत माहिती मिळाली की गळफास घेतलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर तिची ओळख समोर आली. गोदावरीने तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू म्हणाले.