हत्येमागचे कारण अद्यापही गुलदस्त्यात ; आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची नागरिकांमध्ये चर्चा
पातूर प्रतिनिधी19सप्टेंबर:-अकोला जिल्ह्यातील पातूर येथील समर्थ नगर येथे राहणाऱ्या व मुळगाव चोंढी असे असलेल्या डॉक्टर राजेश भास्कर ठाकरे याने दि.16/09/2022 रोजी सायं.6 ते 7 वाजताच्या दरम्यान त्याची पत्नी वर्षा राजेश ठाकरे (वय 35) हिची गळा आवळून हत्या केली व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने चोंढी येथे घेऊन गेला असता गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला व गावातील काही नागरिकांनी घटनेची माहिती चान्नी पोलिसांना दिली असता क्षणाचाही विलंब न करता चोंढीनजीक असलेल्या पिंपरडोळी फाट्यावर आरोपी डॉ.राजेश ठाकरे याची मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक एम.एच. 30 बीबी 6056 थांबवुन पोलिसांनी गाडीचा चालक गोपाल सुखनंदन ठाकरे रा. चोंढी व आरोपी राजेश ठाकरे यांची विचारपूस केल्याने आरोपीने पेशंट सिरीयस असल्याचे सांगितले,पोलिसांनी गाडीचा तपास घेऊन पाहिले असता मागील सीटवर सदरहू महिलेचे प्रेत हे पूर्णपणे ब्लॅंकेटने झाकल्याचे दिसल्याने पोलिसांनी आरोपी डॉ.ठाकरे याची कसून चौकशी केली असता घरगुती वादातून माझ्या पत्नीने गळफास घेतला असून पोस्टमार्टेम करीता अकोला घेऊन जात आहो असे पोलिसांना सांगितले.
मात्र सदर प्रकार हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने मृतदेहासह आरोपीस ताब्यात घेऊन प्रथम तपासणीसाठी प्रा.आ. केंद्र चतारी येथे नेले,तेथील डॉक्टरांनी सदर महिलेस मृत घोषित केले व शवविच्छेदन करिता मृतदेहास सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे नेले, प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार सदर महिलेची गळा आवळून हत्या झाली असे स्पष्ट झाले.त्यानंतर चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी पातूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून पातूर पोलिसांनी आरोपी डॉ.राजेश ठाकरे याच्या विरुद्ध कलम 302,201 भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पातूर पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली.सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीस दि.23 सप्टेंबर पर्यंत पीसीआर दिला असून अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.
सदर खुनाच्या घटनेमागचे नेमके कारण काय? व आरोपी डॉ.राजेश ठाकरे याला सदर गुन्ह्यात आणखी कोणी सहकारी आहेत का ? अशा चर्चांना शहरात उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मृतक वर्षा राजेश ठाकरे व आरोपी राजेश ठाकरे यांचा प्रेमविवाह झालेला असून त्यांना एक 12 वर्षांची मुलगी आहे, तसेच मृतक महिला ही चार ते पाच महिन्यांची गर्भवती होती.अशा अवस्थेत सदर महिलेची व गर्भातील बाळाची देखील हत्या केल्याने शहरभरात हळहळ व्यक्त होत आहे.